Dhurandhar Trailer : अत्यंत क्रूर, निर्दयी अन् रक्तरंजित.., अंगावर काटा आणणारा ‘धुरंधर’चा ट्रेलर

Dhurandhar Trailer : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे. रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, आर. माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळतेय.

Dhurandhar Trailer : अत्यंत क्रूर, निर्दयी अन् रक्तरंजित.., अंगावर काटा आणणारा धुरंधरचा ट्रेलर
Dhurandhar Trailer
Image Credit source: Twitter
Updated on: Nov 18, 2025 | 3:47 PM

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ फेम दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘धुरंधर’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रत्येक कलाकाराचा खतरनाक अवतार पहायला मिळतोय. 4.07 मिनिटांचा हा ट्रेलर अक्षरश: अंगावर काटा आणतो. जबरदस्त अॅक्शन आणि तगडी स्टारकास्ट यांचं समीकरण जुळवण्यात आदित्यला यश मिळालं आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. आदित्यने पुन्हा एकदा पाकिस्तान आणि दहशतवाद यांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे आणि त्यात मल्टीस्टारचा तडकासुद्धा आहे.

जवळपास चार मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त आणि रणवीर सिंह यांच्या भूमिकांची झलक पहायला मिळते. प्रत्येक भूमिकेचा स्क्रीनटाइम चांगला असेल, हे ट्रेलर पाहून सहज समजतं. यामध्ये अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांच्या खलनायकी भूमिका असल्याचं पहायला मिळतंय. अत्यंत क्रूर अशा त्यांच्या भूमिका आहेत. माणसांना ते जणू बाहुल्याच समजतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतानाचे सीन्स पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो.

हा चित्रपट वास्तविक कथेवर आधारित असल्याचं ट्रेलरच्या सुरुवातीला स्पष्ट करण्यात आलं आहे. यामध्ये अर्जुन रामपाल हा मेजर इक्बाल नावाच्या एका आयएसआय एजंटच्या भूमिकेत आहे. त्याच्या भूमिकेची ओळखच अत्यंत हिंसक पद्धतीने करून देण्यात आली आहे. तर आर. माधवनने अजय सन्यालची भूमिका साकारली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून त्याची भूमिका प्रेरित आहे. अक्षय खन्ना यामध्ये रहमान डकाईच्या आणि संजय दत्त हा एसपी चौधरी अस्लमच्या भूमिकेत आहे.

पहा ट्रेलर-

‘धुरंधर’ हा चित्रपट मेजर मोहित शर्मा यांच्या आयुष्यावर आधारित असल्याची चर्चा आहे. जे 2000 च्या सुरुवातीला हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत शिरून इफ्तिखार म्हणून अंडरकव्हर एजंटचं काम करत होते. ‘धुरंधर’चं दिग्दर्शन ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेत्री यामी गौतमचा पती आदित्य धरने केलं आहे. ‘उरी’ या चित्रपटाच्या सहा वर्षानंतर आदित्यचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 5 डिसेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.