
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. हे दोघं गेल्या 16-17 वर्षांपासून या मालिकेत काम करत असून लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. जेठालाल आणि बबिताजी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यामुळे त्यांनी मालिका सोडल्याच्या चर्चांमुळे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. अखेर या चर्चांवर मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत हॉरर कथेचा ट्रॅक सुरू होता. या आगळ्या वेगळ्या ट्रॅकचा फायदा मालिकेच्या टीआरपीलाही झाला. ‘अनुपमा’ला मागे टाकत ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमाकांवर आली. परंतु या संपूर्ण ट्रॅकदरम्यान मालिकेतून जेठालाल आणि बबिता यांच्या भूमिका गायब होत्या. मालिकेतील ट्रॅकनुसार जेठालाल बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि बबिता तिच्या पतीसोबत फिरायला गेली आहे. त्यामुळे दिलीप जोशी आणि मुनमुन यांनी मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे या चर्चांना निर्माते असित कुमार मोदी यांनी चुकीचं म्हटलं आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असित कुमार मोदी म्हणाले, “असं काहीच नाही. सर्वजण आमच्या टीमचा भाग आहेत. त्यांची काही वैयक्तिक कारणं होती, ज्यामुळे ते मालिकेच्या शूटिंगला उपस्थित राहू शकले नव्हते. परंतु त्यांनी मालिकाच सोडल्याच्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. आजकाल सोशल मीडिया खूप नकारात्मक झाला आहे. परंतु तुम्हाला तुमचे विचार सकारात्मक ठेवावे लागतील. आमची ही मालिकासुद्धा सकारात्मक विचारांची आहे. हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे. या मालिकेचे एपिसोड्स पाहून लोक त्यांचं टेन्शन विसरतात. त्यामुळे किमान या शोबद्दल तरी काही नकारात्मक बातम्या पसरवू नका. छोट्या-छोट्या गोष्टींमधून अफवा पसरवणं बरं नाही.”
याआधी मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाहनेही या चर्चांवर प्रतिक्रिया दिली होती. “मला असं वाटत नाही की ते मालिका सोडून जातील. या सर्व अफवा असू शकतात”, असं तो म्हणाला होता. गेल्या काही वर्षांत या मालिकेतून अनेक कलाकारांची एक्झिट झाली. यात दयाबेन, तारक मेहता, रोशन सोढी, गोली यांच्या भूमिका साकारलेल्या कलाकारांचा समावेश आहे.