17 वर्षांनंतर अखेर जेठालाल-बबिताने सोडली ‘तारक मेहता..’ मालिका? चर्चांवर गोगीची प्रतिक्रिया
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेला दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांनी रामराम केल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर आता मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाहने प्रतिक्रिया दिली आहे.

‘तारक मेहता उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या 16-17 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. इतक्या वर्षांत या मालिकेतून काही कलाकार बाहेर पडले आणि त्यांची जागा नव्या कलाकारांनी घेतली. तरीही मालिकेच्या टीआरपीमध्ये काही फरक पडला नाही. उलट गेल्या आठवड्यात ही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. यातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर एक विशेष छाप सोडली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील दोन महत्त्वाच्या भूमिकांबद्दल जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत. यामध्ये ‘जेठालाल’ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी आणि ‘बबिताजीं’च्या भूमिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता यांनी मालिकेला रामराम केल्याची चर्चा आहे. त्यावर आता मालिकेतल्याच एका कलाकाराने प्रतिक्रिया दिली आहे.
दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. इतकंच काय तर या दोघांच्या पात्रांवरील मीम्ससुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. त्यामुळे या दोघांनी मालिका सोडल्याची चर्चा होताच अनेकांनी त्यावरून नाराजी व्यक्त केली. परंतु याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत घोषणा झाली नाही. यादरम्यान मालिकेत ‘गोगी’ची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाहने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘टेली चक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत समयने दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता यांच्या मालिका सोडण्याच्या चर्चांवर मौन सोडलं आहे. तो म्हणाला, “मला असं वाटत नाही की ते मालिका सोडून जातील. या सर्व अफवा असू शकतात.” परंतु याबाबत समयनेही काही ठोस माहिती दिली नाही. खुद्द दिलीप आणि मुनमुन यांनीसुद्धा चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गेल्या काही दिवसांपासून हे दोघं मालिकेतून गायब आहेत. मालिकेतील ट्रॅकनुसार जेठालाल बिझनेसच्या कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि बबिता तिच्या पतीसोबत फिरायला गेली आहे. त्यामुळे हे दोघं कदाचित सुट्ट्यांवर असतील, असंही म्हटलं जात आहे.
गेल्या काही वर्षांत ‘तारक मेहता..’ या मालिकेतून अनेक कलाकारांची एक्झिट झाली. यात दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीचाही समावेश आहे. दिशाने बाळंतपणानिमित्त ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही. तिच्या जागी मालिकेत नव्या दयाबेनचीही निवड अद्याप झाली नाही.
