‘दृश्यम’ फेम गायतोंडेचे 70 लाख रुपये बुडाले; म्हणाला “खऱ्या आयुष्यात मी”

'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या चित्रपटांमध्ये खलनायकी गायतोंडे साकारणारा अभिनेता कमलेश सावंत हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आर्थिक गोष्टींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. माझे 70 लाख रुपये बुडाले, असा खुलासा त्यांनी केला आहे.

दृश्यम फेम गायतोंडेचे 70 लाख रुपये बुडाले; म्हणाला खऱ्या आयुष्यात मी
Kamlesh Sawant
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 08, 2026 | 9:40 AM

अभिनेता कमलेश सावंत यांची ‘दृश्यम’मधील गायतोंडेची भूमिका खूप गाजली होती. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’मध्ये त्यांनी इतक्या दमदार पद्धतीने गायतोंडेची भूमिका साकारली, की आजही त्या भूमिकेला पाहून प्रेक्षकांना प्रचंड संताप येतो. चित्रपटात अजय देवगण आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या गायतोंडेला म्हणजेच कमलेश सावंत यांना मात्र खऱ्या आयुष्यात मोठा आर्थिक फसवणुकीला सामोरं जावं लागलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबाबतचा खुलासा केला. 10 – 20 नव्हे तर तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

70 लाख रुपयांचं नुकसान

‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये ते म्हणाले, “मी पडद्यावर कितीही नकारात्मक भूमिका साकारलो तरी खऱ्या आयुष्यात मी कुणालाही त्रास देत नाही. माझे पैसे परत द्या, असा तगादाही मी कुणाला लावत नाही. यामुळे आतापर्यंत माझं किमान 70 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. माझे इतके पैसे बुडाले आहेत. ते पैसे बुडाले नसते तर माझ्यावर आता घराचं कर्ज नसतं. पण ते पैसे माझे नव्हते, असं मी समजतो. एक-दोन वेळा फोन करून झाल्यावर तिसऱ्यांदा मी सांगतो की, पैसे द्यायचे असतील द्या, नाहीतर जाऊ द्या.”

“वडिलांचं कर्ज मुलाने फेडावं, या विचारांचा मी नाही”

या मुलाखतीत कमलेश यांनी पुढे एक किस्सा सांगितला. केशु रामसे यांचा ‘फॅमिली’ चित्रपट केल्यानंतर 2006 मध्ये त्यांच्याकडे कमलेश यांचं 75 हजार रुपयांचं शेवटचं पेमेंट बाकी होतं. मात्र नुकसान झाल्यामुळे ते बऱ्याच जणांचे पैसे देऊ शकले नव्हते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने कमलेश यांना फोन केला. “सर, तुमचे किती पैसे बाकी आहेत, सांगाल का? बाबांच्या निधनानंतर आम्ही सगळ्यांचे थकीत पैसे परत करत आहोत”, असं तो म्हणाला. त्यावर कमलेश त्याला म्हणाले, “तू कोण आहेस, मी तुला ओळखत नाही. तुझ्यासोबत माझा कोणताही पैशांचा व्यवहार झालेला नाही. माझा व्यवहार तुझ्या वडिलांसोबत झाला होता. ते गेले, तसे माझे पैसेही गेले. विषय संपला.” वडिलांचं कर्ज मुलाने फेडावं, या विचारांचा मी नसल्याचं कमलेश यांनी मुलाखतीत पुढे स्पष्ट केलं. हा स्वभाव कदाचित माझ्या वडिलांकडून माझ्यात आला असावा, असं ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us