VIDEO:छावाचा शेवटचा सीन अन् प्रेक्षकाचं डोकंच फिरलं, शेवटी स्क्रिन फाडूनच थिएटर बाहेर आला

छावा चित्रपटाच्या शेवटचा सीन हा प्रत्येक प्रेक्षकाच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. हाच सीन पाहून एक प्रेक्षक भावूक झाला आणि एवढा संतापला की त्याने थेट थिएटरच्या स्क्रिनचा पडदाच फाडला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

VIDEO:छावाचा शेवटचा सीन अन् प्रेक्षकाचं डोकंच फिरलं, शेवटी स्क्रिन फाडूनच थिएटर बाहेर आला
| Updated on: Feb 19, 2025 | 5:49 PM

सध्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’चित्रपटाचीच सर्वत्र चर्चा आहे. चित्रपट पाहून आलेला प्रत्येक प्रेक्षक भारावून जात आहे. चित्रपटातील प्रत्येक सीन हा अंगावर काटा आणणारा आहे. थिएटरमध्ये सर्वत्र हाऊसफूलचे बोर्ड लागले आहेत. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेत जीव ओतून ती जिवंत केली आहे. प्रेक्षकांनी छावा पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली आहे.

विकी कौशलचं कौतुक करताना थकत नाहीयेत प्रेक्षक

चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचं कौतुक होत आहेच पण सोबतच चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेल्या विकी कौशलचं कौतुक करताना प्रेक्षक थकत नाहीये. विकीवर संभाजी महाराजांची भूमिका साकारणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती. पण त्याने त्याच्या भूमिकेत अक्षरश: जीव ओतला आहे. विकीसोबतच दुसरीकडे औरंगजेबाची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्नाचं देखील तेवढंच कौतुक होतंय.

चित्रपटाचा शेवटचा सीन डोळ्यात अश्रू आणणारा

छावा लागलेल्या थिएटरमधला प्रेक्षक हा शिवगर्जना करूनच थिएटरबाहेर पडतोय, असे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चित्रपटाचा शेवटचा सीन हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारा आहे.

त्या सीनमुळे एकीकडे डोळ्यात पाणी तर दुसरीकडे रक्त खवळतं. या शेवटच्या सीनवेळी एका थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून असं काही तरी घडलं की त्यावरून त्यांना आलेला राग आणि संताप व्यक्त होताना दिसतो.

सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षकाचं डोकं संतापलं

सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून एका प्रेक्षकाचं डोकं संतापलं आणि त्याने थेट थिएटरची स्क्रिनच फाडून टाकल्याचा प्रकार घडला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार घडला ते थिएटर आहे गुजरातमधील भरुच शहरातील. भरुचमधील ब्लू चिप कॉम्प्लेक्समध्ये रविवारी रात्री छावा चित्रपटाच्या रात्रीच्या शो दरम्यान ही घटना घडली.


थिएटरची स्क्रीन फाडली

रात्री 11.45 वाजता सुरू झालेल्या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीन दरम्यान एका प्रेक्षकाने संतापाने थेट थिएटरची स्क्रीन फाडली. जयेश वसावा असं या प्रेक्षकाचं नाव आहे. मात्र यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.ही घटना भरुचच्या आरके सिनेमाझमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि चित्रपटातील हा सीन संभाजी महाराजांना औरंगजेबाने संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांच्या छळाशी संबंधित होता. या सीनमुळे जयेश इतका दुखावला गेला की त्याने स्क्रीनच फाडली. थिएटर व्यवस्थापनाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसांनी प्रेक्षकाला अटक केली 

भरुच पोलिसांनी जयेश वसावा याला अटक केली आहे. त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी अनुचित वर्तन आणि मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संभाजी महाराजांबद्दल सर्वांनाच आदर आहे आणि तो कायम असणार पण याचा अर्थ असं नुकसान करणं योग्य नसल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी देखील जयेशच्या या कृत्याचा निषेध केला आहे.