ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या चर्चांवर अखेर ‘शालू’ने सोडलं मौन; सांगितलं सत्य

'फँड्री' या चित्रपटात शालूची भूमिका साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात काही दिवसांपूर्वी धर्मांतराच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात होती. त्या चर्चांवर अखेर तिने प्रतिक्रिया दिली आहे. राजेश्वरीने खरंच ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे का, याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली आहे.

ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या चर्चांवर अखेर शालूने सोडलं मौन; सांगितलं सत्य
राजेश्वरी खरात
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 27, 2025 | 9:27 AM

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात काही दिवसांपूर्वी तिच्या धर्मामुळे चर्चेत आली होती. राजेश्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो पाहून तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावरून राजेश्वरीला बरंच ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं. आता त्या चर्चांवर राजेश्वरीने मौन सोडलं आहे. “माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबातच झाला आहे आणि मी लहानपणापासूनच ख्रिश्चन आहे. मी कोणताही धर्म बदलला नाही,” असं तिने स्पष्ट केलंय.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश्वरी म्हणाली, “मला फक्त खंत या गोष्टीची वाटते की लोकांचा दृष्टीकोन खूप मर्यादित आहे. हा दृष्टीकोन इतका मर्यादित आहे की त्यांना समोरचं सत्य बघायचंच नाहीये. फोटो पाहिले आणि काही विचार न करता धडाधड कमेंट्स केले. बातम्यांमध्येही मी धर्मांतर केलं असं म्हटलं गेलं. त्यामागची पार्श्वभूमी जाणून घेतली नाही. तुम्ही मला ओळखत नाही, माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीला ओळखत नाही. माझा तेव्हापासून बातम्यांवरून विश्वासच उडाला आहे. ट्रोलर्सना प्रकाशझोतात राहायला खूप आवडतं. कमेंट्समध्ये सगळं चुकीचं लिहिणार, पण डीएममध्ये (डायरेक्ट मेसेज) ‘आय लव्ह यू’, ‘आय मिस यू’, ‘मला तुला भेटायचंय’ असं करतात. तीच लोकं कमेंट्समध्ये खराब बोलतात.”

धर्मांतर करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, असंही मत तिने मांडलं आहे. “धर्म बदलणं किंवा इतर एखादी गोष्ट असेल.. ही ज्याची-त्याची मर्जी असते. ही प्रत्येकाची वैयक्तिक निवड आहे आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे. पण लोकांनी त्यावरून टीका करणं चुकीचं आहे. मला असंही वाटतं की जे लोक टीका करतात, त्यांच्या आयुष्यात खूप टेन्शन असतं, अस्वस्थता आहे, चिडचिड आहे. ही अयशस्वी लोकं आहेत. हा सगळा त्रास कुठेतरी व्यक्त करण्यासाठी त्यांना एक जागा भेटते, ती म्हणजे सोशल मीडिया. मग असं काही दिसलं की त्यांचा रुबाब, राग, द्वेष हे सगळं घेऊन की इथे कमेंट्समध्ये ओतायचं,” अशी प्रतिक्रिया राजेश्वरीने दिली.

या मुलाखतीत तिने ट्रोलर्सनाही सडेतोड उत्तर दिलंय. “लोकांनी मला ट्रोल केल्याचं काहीच वाटत नाही. कारण मला त्याचा फायदाच होतो. प्रसिद्धी कोणतीही असो ती प्रसिद्धी आहेच. मी धर्मांतर केलेलं नाही, मी जन्मापासून ख्रिश्चनच आहे. मला धर्म ही इतकी मोठी गोष्ट वाटत नाही. देव हा चर्च, मंदिर किंवा मशिदीत दिसत नाही. एखादी व्यक्ती माझ्यासोबत चांगली वागत असेल तर तिच्यामध्येही देव आहे,” असं ती म्हणाली.