श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 45 गुंतवणूकदारांची 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एका फसव्या योजनेची जाहिरात या दोघांनी केली होती.

श्रेयस तळपदे, आलोक नाथ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
Shreyas Talpade and Alok Nath
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2025 | 9:27 AM

अभिनेता श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. या दोघांविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आलोक नाथ, श्रेयस तळपदे आणि क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पाच सदस्यांनी 45 गुंतवणूकदारांची 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

फसवी योजना

16 सप्टेंबर 2016 रोजी ‘ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ या संस्थेनं हरियाणा आणि लखनऊसह अनेक राज्यांमध्ये फसवणुकीचा व्यवसाय सुरू केला होता. ही सोसायटी मध्य प्रदेशातील इंदूर इथं नोंदणीकृत असल्याचं सांगण्यात आलं होतं. हे मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायद्याअंतर्गत काम करत होतं. यामध्ये गुंतवणूकदारांना मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यांसाख्या योजनांच्या ऑफर दिल्या जात होत्या. चांगल्या व्याजदराचं आमिष दाखवून अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली. या फसव्या योजनेतत असंख्या सर्वसामान्य लोक अडकले. लोकांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून ही कंपनी अचानक गायब झाली.

बॉलिवूड कलाकार आणि इतर 11 जणांवरही याच मल्टी लेव्हल मार्केटिंग घोटाळ्याप्रकरणी हरियाणाच्या सोनीपतमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही सोसायटी गेली सहा वर्षे लोकांकडून पैसे गोळा करत होती. मात्र लोकांनी पैसे परत मागितल्यावर संचालक फरार झाला. आलोक नाथ आणि श्रेयस तळपदे या दोन्ही अभिनेत्यांनी या सोसायटीच्या गुंतवणूक योजनांचा प्रचार केला होता. तर अभिनेता सोनू सूदही या संस्थेच्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता. याप्रकरणी अद्याप कोणत्याच कलाकाराकडून प्रतिक्रिया समोर आली नाही.

खोटी आश्वासनं देऊन पैसे उकळले

या सोसायटीने मल्टी-लेव्हल मार्केटिंगचं मॉडेल स्वीकारलं आणि सर्वसामान्यांना खोटी आश्वासनं देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले. हळूहळू सोसायटीने एक विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून स्वत:ची स्थापना केली आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे सुरक्षित राहतील याची खात्री दिली. या सोसायटीशी संबंधित असलेल्या विपुल या एजंटने दिलेल्या माहितीनुसार, त्यात एक हजारहून अधिक खाती उघडली होती. परंतु एकाही खात्यातून अद्याप पैसे मिळाले नाहीत. या संस्थेच्या राज्यभरात 250 हून अधिक शाखा होत्या. सुमारे 50 लाख लोक या संस्थेशी जोडले गेले होते.

एजंट्सच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लोकांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन दिल्याचं विपुलने सांगितलं. या कामासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचाही वापर करण्यात आला. याशिवाय सोसायटीने हॉटेल्समध्ये मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमांमध्ये गुंतवणूकदार आणि एजंट यांना त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री देण्यात आली होती.