
अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ची माजी विजेती गौहर खान वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने चाहत्यांना गोड बातमी दिली होती. गौहरने प्रसिद्ध संगीतकार ईस्माइल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केलंय. याआधी 2023 मध्ये तिने मुलाला जन्म दिला होता. मुलाच्या जन्मानंतर तिने करिअरमधून काही काळ ब्रेक घेतला. त्यानंतर तिने युट्यूबवरील व्लॉगद्वारे पुनरागमन केलं. नुकत्याच एका व्लॉगमध्ये गौहर प्रेग्नंसीमध्ये येणाऱ्या अडचणी आणि समस्यांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. यावेळी तिने अभिनेते सुनील शेट्टी यांच्या एका वक्तव्यावरून राग व्यक्त केला. सुनील शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सी-सेक्शन डिलिव्हरीबद्दल वक्तव्य केलं होतं.
सुनील शेट्टी नुकतेच आजोबा बनले आहेत. त्यांची मुलगी अथिया शेट्टीने काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला. अथियाने मुलीच्या जन्मासाठी सी-सेक्शन म्हणजेच ऑपरेशनऐवजी नॉर्मल डिलिव्हरचा पर्याय निवडला होता. याबद्दल बोलताना सुनील शेट्टी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, “माझ्या मुलीने सी-सेक्शनच्या कम्फर्टची निवड केली नाही.” या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यांना ट्रोल केलं होतं. आता गौहर खाननेही त्यांच्या मतावर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या व्लॉगमध्ये तिने सुनील शेट्टी यांचं थेट नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
“नुकतंच एका मोठ्या सेलिब्रिटीने म्हटलं होतं की सी-सेक्शन हा सर्वांत सोपा पर्याय आहे. याचा काय अर्थ आहे? मी त्यांना विचारू इच्छिते की तुम्ही असं कसं म्हणू शकता? नॉर्मल डिलिव्हरी आणि सी-सेक्शन अशा दोन्ही पर्यायांमध्ये एकसमान वेदना होतात. सी-सेक्शनशी संबंधित बरेच समज-गैरसमज आहेत. त्यापैकीच एक म्हणजे की हा पर्याय खूप सोपा मानला जातो. यावर आता मी काय बोलावं हेच मला कळत नाही. लोकांना इतकी चुकीची माहिती कशी असू शकते? एका पुरुष सेलिब्रिटीने असं म्हणणं, ज्यांना प्रेग्नंसीबद्दल काहीच माहीत नाही, ज्यांनी ते अनुभवलं नाही, बाळाला जन्म दिला नाही, सी-सेक्शन खरंच किती वेदनादायी असू शकतं याची जाणीव नाही.. ते अशी मतं मांडतायत”, अशा शब्दांत गौहरने टीका केली.
याविषयी ती पुढे म्हणाली, “मी हे स्पष्टपणे सांगू इच्छिते की नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सी-सेक्शन.. यापैकी एकाची निवड करणं हे महिलेच्या हातात नसतं. काही महिला नॉर्मल डिलिव्हरी करू शकतात, तर काहींसाठी ते शक्य नसतं. अनेकदा मेडिकल परिस्थितीमुळे डॉक्टरांना निर्णय घ्यावा लागतो. आई आणि बाळ दोघांची सुरक्षा महत्त्वाची असते. सी-सेक्शन काही शॉर्टकट नाही. ही फक्त एक गरज असून ते संपूर्णपणे नैसर्गिक आहे. जरी महिला सी-सेक्शनचा पर्याय निवडत असतील तरी तो कोणत्याच अर्थाने सोपा पर्याय नाही. हा केवळ लोकांचा गैरसमज आहे.”
गौहर खानने सी-सेक्शनद्वारे पहिल्या मुलाला जन्म दिला होता. “लोक सतत मला विचारतात की डिलिव्हरी कशी झाली- नॉर्मल की सी-सेक्शन? हा खूपच खासगी प्रश्न आहे. यावरून इतका हंगामा का केला जातो, हेच मला कळत नाही”, असं ती पुढे म्हणाली. पहिल्या बाळाच्या जन्माआधी गौहरचा गर्भपातसुद्धा झाला होता. काही महिन्यांच्या प्रेग्नंसीनंतर तिचा गर्भपात झाला होता.