Genelia Deshmukh : पहिल्या मुलाच्या जन्मानंतर मला अपयशी ठरल्यासारखं वाटलं…जिनिलिया देशमुखचं वक्तव्य चर्चेत
Genelia Deshmukh : अभिनेत्री जिनिलिया देशमुखनं नुकत्याच एका मुलाखतीत मातृत्वाबद्दल भाष्य केलं आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुख आपल्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केल्यानंतर जिनिलियानं काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहून कुटुंब आणि मुलांकडे लक्ष दिलं. आता अभिनेत्रीनं एका मुलाखतीत आई झाल्यानंतर आलेले अनुभव मोकळेपणाने सांगितले आहेत. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर अपयशी ठरल्यासारखं वाटत होतं, असं अभिनेत्री म्हणाली.
मातृत्वाबद्दल काय म्हणाली जिनिलिया?
जिनिलियानं जेनिस सिक्वेराला दिलेल्या मुलाखतीत मातृत्वातील चढ-उतारांबद्दल भाष्य केलं. पहिल्यांदा आई झाल्यानंतर नेमकं काय करावं, मुलाची काळजी कशी घ्यावी, याबाबत तिला अनेक प्रश्न पडत होते. जिनिलिया म्हणाली की, ‘मला आठवतंय माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर मला अपयशी ठरल्यासारखं वाटलं होतं. मला काहीच माहीत नव्हतं त्यामुळे खूप गोंधळले होते, पण दुसऱ्या मुलाच्यावेळी मला सगळं माहीत होतं. माझ्याकडे अनुभव होता.’
‘स्त्री म्हणून तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. मी नेहमीच मनात जे आहे ते स्पष्टपणे बोलणारी व्यक्ती आहे, पण मी गरज नसताना कुठल्याही पुरुषाला माझा मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न करत नाही. मी तशी व्यक्ती नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही पुढे जाऊन लग्नच करायचं आहे, असे विचार असलेल्या घरातून येतात जिथे प्रत्येकाला त्यांना हवं ते करण्याची मुभा नसते. पण मी याला अपवाद होते. माझ्या पालकांनी मला कधीच रोखलं नाही. मी फुटबॉल, बास्केटबॉल खेळणारी एकटीच मुलगी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही स्वत:चा मार्ग स्वत: निवडता.’ असं जिनिलिया म्हणाली.
दरम्यान, जिनिलिया सध्या तिच्या आगामी ‘गनमास्टर जी 9’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहे. आदित्य दत्त दिग्दर्शित या चित्रपटात इमरान हाश्मी आणि जिनिलिया महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. जिनिलिया या चित्रपटात आरतीची, तर इमरान ईश्वरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 27 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी जिनिलिया ‘राजा शिवाजी‘, ‘मस्ती 4′, ‘सितारे जमीन पर‘, ‘जय हो‘, ‘तेरे नाल लव्ह हो गया‘ यांसारख्या सिनेमांमध्ये झळकली आहे.