VIDEO : ऑटोग्राफ द्यायला गेलेल्या कृणाल पांड्यासोबत मैदानावरच…. संताप आणणारा व्हिडिओ
सामना जिंकल्यानंतर चाहत्यांना ऑटोग्राफ देण्यासाठी गेलेल्या कृणाल पांड्याच्या दिशेने चक्क बूट फेकण्यात आला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कृणाल संतापला, त्याने चाहत्याला इशाराही दिला. पण त्यानंतरही मैदान सोडण्याऐवजी तो चाहत्यांना ऑटोग्राफ देत राहिला. त्याच्या याच कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सामना जिंकल्यानंतर चाहत्यांना भेटायला जाणं, त्यांच्यासोबत फोटो काढणं, ऑटोग्राफ देणं हे क्रिकेटपटूंसाठी नेहमीचाच भाग असतो. पण अशाच एका भेटीत कृणाल पांड्यासोबत विचित्र प्रकार घडला. सामना संपल्यानंतर तो चाहत्यांना ऑटोग्राफ देण्यासाठी पुढे गेला. त्याचवेळी गर्दीतून त्याच्या दिशेने बूट फेकण्यात आला. कृणालने पहिला बूट पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर आणखी एक बूट त्याच्या दिशेने आला. तो थोडक्यात बचावला. या प्रकारानंतर कृणालचा संतापही दिसला. मात्र, पुढे त्याने जे केलं, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चाहत्याने कृणालच्या दिशेने फेकला बूट
हा प्रकार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 मधील बडोदा आणि झारखंड सामन्यानंतर घडला. बडोदा संघाने हा सामना 5 विकेट्सने जिंकला होता. सामना संपल्यानंतर बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या बाउंड्रीजवळ आलेल्या चाहत्यांना ऑटोग्राफ देण्यासाठी गेला. यावेळी एका चाहत्याने त्याच्या दिशेने बूट फेकला. कृणालने तो पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, लगेच दुसरा बूटही त्याच्या दिशेने आला. यावेळी कृणाल थोडक्यात बचावला.
कृणालचा संताप, चाहत्याला दिला इशारा
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कृणाल पांड्या संतापला. त्याने बूट फेकणाऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवत पुन्हा असं करू नको, असा इशारा दिला. मात्र, त्यानंतर त्याने स्वतःला शांत केलं. विशेष म्हणजे, या प्रकारानंतरही कृणाल चाहत्यांना भेटण्यासाठी थांबला. त्याने ऑटोग्राफ दिले. एका चाहत्याच्या जॅकेटवरही सही केली. बूट फेकण्याच्या प्रकारानंतर कृणालने चाहत्यांशी संवाद सुरूच ठेवला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बडोदा संघाची स्पर्धेत दमदार कामगिरी
कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली बडोदा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करत आहे. संघाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून, त्यापैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या सामन्यात चंदीगडविरुद्ध पराभव झाल्यानंतर बडोद्याने सलग 5 सामने जिंकले. संघाने 20 गुण मिळवत गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. कृणालने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली असून, 6 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आहेत.
