कोणाच्या बापाकडे..; सेटवर उशिरा येण्याच्या आरोपांवर भडकला गोविंदा

अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल यांचा टॉक शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये गोविंदाने नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी तिघांनी इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर गप्पा मारल्या आणि काही आठवणींनाही उजाळा दिला.

कोणाच्या बापाकडे..; सेटवर उशिरा येण्याच्या आरोपांवर भडकला गोविंदा
Govinda
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2025 | 9:15 AM

अभिनेता गोविंदा हा त्याच्या काळातील सर्वांत यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलंय. त्याचं अभिनय, डान्स, विनोदाची अचूक टायमिंग प्रेक्षकांना आजही फार आवडते. गोविंदाकडून चित्रपट साइन करून घेण्यासाठी दिग्दर्शकांची रांग त्याच्या घराबाहेर लागायची. एकाचवेळी तो पाच-पाच शिफ्टमध्ये काम करत होता. त्यामुळे अनेकदा त्याच्यावर आरोप झाले की, गोविंदा सेटवर कधीच वेळेवर येत नाही. आता नुकत्याच एका शोमध्ये गोविंदाने या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘टू मच विद ट्विंकल अँड काजोल’ या शोच्या नवीन एपिसोडमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती.

या शोची सूत्रसंचालिका ट्विंकल खन्नाने गोविंदासोबत काम करतानाचा अनुभव सांगितला. जेव्हा मी गोविंदासोबत काम करत होते, तेव्हा तो 14-14 चित्रपट एकाच वेळी करत होता, असं ती म्हणाली. चित्रपटाच्या सेटवर गोविंदा वेगवेगळ्या पोशाखांमध्ये यायचा, असाही खुलासा तिने केला. एकाच वेळी इतक्या चित्रपटांमध्ये काम करताना डायलॉग्स लक्षात राहायचे का, असा प्रश्न गोविंदाला विचारण्यात आला. त्यावर गोविंदा म्हणाला, “माझ्या सगळं लक्षात राहतं. किर्तीने मला खूप घाबरवलं होतं. चीची कोणत्याच प्लॅनिंगशिवाय चित्रपट करतोय, जर तो हिट झाला नाही तर त्याचं करिअर धोक्यात येईल, असं तो म्हणायचा. त्याच भीतीमुळे मी अधिक प्रामाणिक होऊन काम करू लागलो होतो.”

सेटवर कधीच वेळेवर न आल्याच्या आरोपांवर गोविंदा पुढे म्हणाला, “मी वेळेवर येत नाही, म्हणून मला बदनाम केलं गेलं. मी म्हणतो, कोणाच्या बापामध्ये एवढी ताकद आहे की पाच शिफ्ट करून तो वेळेवर पोहोचू शकेल. हे शक्यच नाही. होऊच शकत नाही. एकाच वेळी पाच शिफ्टमध्ये काम करणारा माणूस कसा वेळेत पोहोचणार? इथे तर लोक एक चित्रपट करून थकून जातात.”

गोविंदाने आतापर्यंतच्या करिअरमध्ये 165 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. नव्वदच्या दशकात त्याने एकानंतर एक सुपरहिट चित्रपटे दिली आहेत. ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर 1’, ‘साजन चले ससुराल’, ‘हिरो नंबर 1’, ‘दुल्हे राजा’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘अनाडी नंबर 1’, ‘हसीना मान जाएगी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘जोडी नंबर वन’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.