हंसिका मोटवानी लग्नाच्या 4 वर्षांतच पतीपासून विभक्त; नेमकं कुठे बिनसलं? अनेक जोडपं करतात ‘ही’ चूक

अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि सोहेल खटुरिया यांनी लग्नाच्या चार वर्षांतच घटस्फोट घेतला आहे. या दोघांच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण हंसिकाच्या वकिलांनी सांगितलं आहे. 2022 मध्ये हंसिका आणि सोहेलने धूमधडाक्यात लग्न केलं होतं.

हंसिका मोटवानी लग्नाच्या 4 वर्षांतच पतीपासून विभक्त; नेमकं कुठे बिनसलं? अनेक जोडपं करतात ही चूक
हंसिका मोटवानी, सोहेल खटुरिया
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2026 | 10:28 AM

गेले वर्षभर अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि पती सोहेल खटुरिया वेगळे राहिल्यानंतर अखेर कायदेशीररित्या ते विभक्त झाले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. आता लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला आहे. हंसिका आणि सोहेलच्या वैवाहिक आयुष्यात गेल्या दोन वर्षांपासून समस्या सुरू होत्या. वेगळं राहिल्यानंतर त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला, त्यानंतर मुंबईतल्या वांद्रे फॅमिली कोर्टाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आहे. या दोघांमध्ये नेमकं कुठे बिनसलं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता हंसिकाच्या वकिलांनी त्यांच्या घटस्फोटामागचं खरं कारण सांगितलं आहे.

हंसिकाने तिची खास मैत्रिणीच्या पूर्व पतीशीच लग्न केलं होतं, परंतु लग्नाच्या काही महिन्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यानंतर हंसिका आणि सोहेल यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. घटस्फोटानंतर हंसिकाने सोहेलकडून पोटगीची मागणी केली नसल्याचं तिच्या वकिलांनी स्पष्ट केलं. वकील अदनान शेख यांनी हंसिकाचं प्रतिनिधित्व केलं होतं. लग्नानंतर हंसिका आणि सोहेल यांच्या वैवाहिक आयुष्यात काही मतभेद निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. आपले विचार, आवडीनिवडी, लाइफस्टाइल एकमेकांपेक्षा खूप वेगळे असल्याचं दोघांना हळूहळू जाणवत होतं. त्यातूनच क्षुल्लक कारणांमुळे दोघांमध्ये भांडणं होऊ लागली होती. या भांडणांना वैतागून हंसिका तिच्या माहेरी निघून गेली.

कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं गेलं की छोट्या-छोट्या गोष्टींवरून हंसिका आणि सोहेल यांच्यात सारखी भांडणं व्हायची, ज्यामुळे एकाच घरात राहणं दोघांसाठीही कठीण झालं होतं. अखेर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनी त्यांना समजावण्याचा आणि त्यांचं नातं सुधारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांनाही अपयश आलं, असं याचिकेत नमूद केलंय. लग्नाआधी एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी, लाइफस्टाइल समजून न घेताच अनेक जोडपं घाई करतात. परंतु जेव्हा 24 तास जोडीदारासोबत राहायची वेळ येते, तेव्हा अनेक मतभेद निर्माण होतात. अनेक जोडपं ही चूक करताना दिसतात आणि हंसिका-सोहेलच्या बाबतीत हेच झाल्याचं समजतंय.

लग्नानंतर हंसिका सोहेल आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत एकाच घरात राहू लागली होती. परंतु मोठ्या कुटुंबात एडजस्ट करण्यात तिला काही अडचणी आल्या. त्यानंतर सोहेल आणि हंसिकाने त्याच इमारतीत दुसरा फ्लॅट घेऊन तिथे दोघं राहायला गेले. कुटुंबीयांपासून वेगळं राहिल्यानंतरही त्यांच्यातील वाद कमी होत नव्हते. हंसिका मोटवानी आणि सोहेल खटुरिया 2 जुलै 2024 पासून वेगवेगळे राहत आहेत. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी संवाद साधून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत प्रक्रियेला सुरुवात केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us