
बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 23 जून रोजी लग्न करणार आहे. तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल सोबत तिने लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईत झहीर इक्बालच्या घरीच रजिस्टर मॅरेज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नासाठी सोनाक्षी आणि झहीरने फक्त जवळच्या मित्रांना आमंत्रित केले आहे. सकाळी रजिस्टर मॅरेज झाल्यानंतर संध्याकाळी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.
हीरामंडी अभिनेत्रीने नुकताच तिचा 37 वा वाढदिवस साजरा केला. सोनाक्षीचा जन्म 2 जून 1987 रोजी अभिनेता शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या घरी झाला. सोनाक्षी सिन्हा हिने 2010 मध्ये सलमान खानसोबत ‘दबंग’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तर झहीरने 2019 मध्ये सलमानच्या प्रॉडक्शन नोटबुकमधून अभिनयात पदार्पण केले होते. यापूर्वी त्याने चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
झहीरचा जन्म 10 डिसेंबर 1988 रोजी मुंबईत झालाय. सध्या त्यांचे वय 35 वर्षे आहे. तो सोनाक्षीपेक्षा दीड वर्षांनी लहान आहे. सोनाक्षी, झहीर आणि त्यांच्या मित्रांनी लग्नाच्या बातम्यांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
सोनाक्षी आणि झहीर गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी ते एकत्र दिसले आहेत. त्यांनी नात्याची कबुली दिली होती. अनेकदा मुंबईतील रेस्टॉरंट आणि इतर ठिकाणी ते एकत्र स्पॉट केले जातात.
अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसाठी दोघेही पोस्ट शेअर करतात. सोनाक्षी आणि झहीर यांनी नवीन वर्ष एकत्र साजरे केले होते. अभिनेत्रीला स्कुबा डायव्हिंग करायला आवडते. त्यामुळे दोघांनी देखील ते एकत्र केले होते. सोनाक्षी आणि झहीरने २०२२ च्या डबल एक्सएल चित्रपटात एकत्र काम केले आहे.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा विवाह होत असला तरी सोनाक्षीचे कुटुंबिय नाराज असल्याची देखील चर्चा आहे. सोनाक्षीचे भाऊ आणि आई नाराज आहेत. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील यावरुन मतभेद असल्याचं स्वीकारलं आहे. पण आता सगळे या लग्नात सहभागी होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.