हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेत्री शिल्पा शिंदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला की, तिने दहा वर्षांपूर्वी 'भाभीजी घर पर हैं'च्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे खोटे आरोप केले होते. कारण त्यावेळी तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. यावर आता हिनाने प्रतिक्रिया दिली आहे.

हे अत्यंत लज्जास्पद..; मराठमोळ्या अभिनेत्रीवर भडकली हिना खान, नेमकं काय आहे प्रकरण?
हिना खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 04, 2026 | 10:15 AM

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदेनं ‘भाभीजी घर पर हैं’च्या निर्मात्यांवर खोटे लैंगिक शोषणाचे आरोप केल्याचा खुलासा तब्बल 10 वर्षांनी केला आहे. यावरून सोशल मीडियावर आणि टीव्ही इंडस्ट्रीत एक नवीन वाद निर्माण झाला आहे. शिल्पाच्या या कबुलीवर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानसुद्धा यावर मोकळेपणे व्यक्त झाली आहे. हिनाने शिल्पा शिंदेवर टीका करत ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी शिल्पाने ‘भाभीजी घर पर हैं’ ही लोकप्रिय मालिका सोडली होती. त्यावेळी निर्मात्यांसोबत तिचे मोठे वाद झाले होते. शिल्पाने निर्माते संजय कोहली यांच्यावर लैंगिक शोषणासह मानसिक छळाचाही आरोप केला होता. आता भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये शिल्पाने खुलासा केला की, ते आरोप खोटे होते.

हिना खानची शिल्पावर टीका

हिना खानने याप्रकरणी तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं, ‘मी सहसा अशा प्रकरणांवर टिप्पणी करणं टाळते, ज्याचा माझ्याशी काही संबंध नसतो. परंतु याप्रकरणी बोलणं मला गरजेचं वाटतंय. कारण इथे पीडित तो पुरुष आहे, ज्याला पत्नी-मुलं आणि कुटुंब आहे. त्याच्या कुटुंबात इतर महिलासुद्धा आहेत. तो खूपच मेहनती निर्माता आहे. एक अभिनेत्री असल्याच्या नात्याने मी इतकं तर बोलूच शकते की, एखादी लढाई जिंकण्यासाठी दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने गंभीर आरोप करणं हे अत्यंत लज्जास्पद आहे. अशा पद्धतीने एखाद्याची बदनामी करणं खूप चुकीचं आहे. असे आरोप करूनही तुला त्या मालिकेत पुन्हा स्थान मिळालं. आपल्याला अशा लोकांना रोखायला हवं, जेणेकरून दुसरी कोणती महिला असे खोटे आरोप कोणावरच करू शकणार नाही.’

या पोस्टमध्ये हिनाने असंही स्पष्ट केलं, जर एखाद्यासोबत खरंच काही चुकीचं घडलं असेल तर त्या व्यक्तीला न्याय मागण्याचा आणि आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त हिनाच नाही तर याआधी अभिनेत्री पूजा बेदीनेही शिल्पाच्या अशा वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. “अशा खोट्या आरोपांमुळे लैंगिक शोषणाच्या खऱ्या पीडितांना त्रास होतो. कायद्याचा असा गैरवापर होऊ नये, कारण त्यामुळे विश्वासार्हतेवर परिणाम होतो”, असं मत तिने मांडलं. तर अभिनेता करण ओबेरॉयने या आरोपांची निष्पक्षपणे आणि सखोल चौकशीची मागणी केली.

Follow Us