Bigg Boss 20: माझ्या मुलांना बिग बॉस पाहू देणार नाही.. जय भानुशाली संतापला; या गोष्टीवरून चांगलंच सुनावलं
Bigg Boss 20: आपल्याला किंवा आपल्या मुलांना बिग बॉसशी संबंधित नकारात्मक पोस्टमध्ये टॅग करू नये, अशी विनंतीही त्याने केली. अखेरीस 'थँक यू, गुडबाय बिग बॉस 20' असं म्हणत त्याने या शोपासून दूर राहण्याचे संकेत दिले आहेत.

Jay Bhanushali: बिग बॉसच्या घरात सुरू असलेल्या वादविवादांमध्ये आता स्पर्धकांच्या कुटुंबीयांचीही चर्चा होऊ लागली आहे. अभिनेत्री माही विजच्या खेळावरून सुरू असलेल्या वादात तिची सात वर्षांची मुलगी तारा हिचा उल्लेख करण्यात आल्याने अभिनेता आणि माहीचा पूर्वाश्रमीचा पती जय भानुशाली चांगलाच संतापला आहे. यंग डीएसए, कनिका मान आणि लव्ह गिल यांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत जयने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. इतकंच नाही, तर यापुढे आपल्या मुलांना बिग बॉस पाहू देणार नसल्याचा निर्णयही त्याने जाहीर केला आहे.
जय भानुशालीची पोस्ट-
‘बिग बॉसमध्ये जे काही घडलं ते पाहिल्यानंतर, एक पिता म्हणून मी एक निर्णय घेतला आहे की, यापुढे मी माझ्या मुलांना बिग बॉस पाहू देणार नाही. मी आधीच ठरवलं होतं की, मी कोणाच्याही खेळाबद्दल बोलणार नाही, कोणत्याही स्पर्धकाबद्दल माझं मत मांडणार नाही आणि जिथे गरज असेल तिथे माहीला पाठिंबा देईन. पण केवळ एका टास्कसाठी यंग डीएसएने माझी मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या आईच्या वागण्याची त्यांना लाज वाटेल, असं बोलणं, कनिकाने माहीच्या मुलांना कधीच भेटायला आवडणार नाही, असं म्हणणं आणि लव्ह गिलच्या आईनेही तिच्या मुलीबद्दल असंच कोणी बोललं तर तिला कसं वाटेल, असा प्रश्न उपस्थित करत माझ्या मुलीला या चर्चेत ओढणं… हे सगळं अत्यंत चुकीचं आहे,’ अशा शब्दांत त्याने संताप व्यक्त केला.
वाचा पोस्ट-
या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिलं, ‘तारा अवघ्या 7 वर्षांची चिमुरडी आहे. ती बिग बॉसमधील स्पर्धक नाही. एखाद्याला कमी लेखण्यासाठी एका लहान मुलाचा वापर करणं हे पूर्णपणे निरर्थक आणि अस्वीकार्य आहे. खरंच, ज्या गोष्टीशी आपल्या मुलांचा काहीही संबंध नाही, त्यामध्ये त्यांना का ओढलं जात आहे? बिग बॉस हा एक खेळ आहे. तुम्ही माहीच्या खेळाशी असहमत असू शकता, तिच्या खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करू शकता, तिच्या निर्णयांना आव्हान देऊ शकता. पण त्यासाठी तिची मुलं, मातृत्व आणि वैयक्तिक आयुष्य यांना मधे आणणं म्हणजे मर्यादा ओलांडण्यासारखं आहे. एक पिता म्हणून मला माझ्या मुलांनी अशा मानसिक त्रासातून जावं, असं अजिबात वाटत नाही. माहीला खाली खेचण्यासाठी प्रत्येक वाक्यात ताराच्या नावाचा वापर केला जातोय, हे माझ्या मुलांच्या मनावर परिणाम करणारं आहे. इतरांसाठी हा खेळ मनोरंजनाचा भाग असेल, पण आमच्यासाठी ही वैयक्तिक बाब आहे. माझ्या मुलांची मानसिक शांतता आणि निरागसता यापेक्षा महत्त्वाचं माझ्यासाठी काहीही नाही. धन्यवाद, गुडबाय बिग बॉस 20.’
नेमकं काय घडलं बिग बॉसच्या घरात?
‘बिग बॉस 20’मध्ये नुकत्याच झालेल्या एका टास्कदरम्यान माही विजला रडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या टास्कमध्ये स्पर्धकांनी माहीच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि मातृत्वाचा उल्लेख केला. यंग डीएसएने माहीची मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्या आईच्या वागण्याची त्यांना लाज वाटेल, अशा आशयाचं वक्तव्य केलं. तर कनिका मानने माहीच्या मुलांना भेटण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं. याशिवाय लव्ह गिलच्या आईनेही माहीच्या मुलीचा उल्लेख करत, तिच्या मुलीबद्दल कोणी असं बोललं तर तिला कसं वाटेल, असा प्रश्न उपस्थित केला.