ॲटिट्यूड तर बघा..; जय दुधाणेचा अटकेनंतरचा पोलीस व्हॅनमधील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अभिनेता जय दुधाणेचा अटकेनंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. पोलीस व्हॅनमधील जयचं वागणं आणि एकंदरीत त्याची देहबोली पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय.

ॲटिट्यूड तर बघा..; जय दुधाणेचा अटकेनंतरचा पोलीस व्हॅनमधील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Jay Dudhane
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 07, 2026 | 2:34 PM

‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता जय दुधाणेला मुंबई एअरपोर्टवरून पोलिसांनी अटक केली होती. पाच कोटी रुपयांच्या फसणवूक प्रकरणात त्याच्यावर अटकेची कारवाई झाली. काही दिवसांपूर्वीच जयचं लग्न झालं होतं. लग्नानंतर तो पत्नी हर्षला पाटीलसोबत हनिमूनला जात होता. तेव्हा त्याला एअरपोर्टवरच पोलिसांनी रोखलं आणि अटक केली. या अटकेनंतर आता जय दुधाणेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अटकेनंतर पोलीस व्हॅनमधील जयची एकंदर देहबोली पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय. ‘ॲटिट्यूड तर बघा..’ असं एकाने म्हटलंय. तर ‘किती हा माज’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जय पोलीस व्हॅनमध्ये बसलेला असून काहीतरी संवाद साधताना दिसत आहे.

ठाण्यातील जयची दुकानं बँकेकडे गहाण असतानाही त्याने ती विकण्याचा प्रयत्न करून फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. दुकानं गहाण असतानाही जयने तक्रारदारासोबत आर्थिक व्यवहार केले होते. पोलिसांकडे ही तक्रार दाखल होताच त्यांनी मुंबई विमानतळावरून जयला अटक केली. त्यावेळी जय त्याच्या पत्नीसोबत हनिमूनला जात होता. 24 डिसेंबर 2025 रोजी जयचा लग्नसोहळा पार पडला होता.

पहा व्हिडीओ-

जय दुधाणेवर आरोप काय?

पोखरण रोड क्रमांक एक भागातील गांधीनगर परिसरात जयच्या कुटुंबीयांची पाच दुकानं आहेत. मार्च 2024 मध्ये ही दुकानं विक्रीसाठी असल्याची माहिती तक्रारदाराला मिळाली होती. त्यांनी याबाबत जय आणि त्याच्या वडिलांकडे चौकशी करून गाळे खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. दुकानांच्या विक्रीची किंमत 4 कोटी 90 लाख रुपये ठरल्यानंतर मार्च ते मे 2024 पर्यंत तक्रारदाराने जयच्या कुटुंबीयांना 3 कोटी 25 लाख रुपये धनादेशाद्वारे पाठवलं.

जून 2024 मध्ये जयच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर तक्रारदाराने जयकडे दुकानांच्या व्यवहारासंदर्भात विचारणा केली असता, त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तक्रारदाराने जयकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्याने ही दुकानं एका बँकेकडे गहाण असल्याचं सांगितलं. व्यवहाराप्रमाणे तक्रारदाराने 94 टक्के रक्कम दुधाणेला दिली होती. पुढील प्रक्रियेसाठी जयला विचारलं असता त्याने बँकेचं तारण कर्ज फिटलं नसून दुकानांवर जप्ती येणरा असल्याची कबुली दिली होती. इतकंच नव्हे तर ही जप्ती टाळण्यासाठी त्याने आणखी 55 लाख रुपयांची मागणी केली. तसंच बँकेचं कर्जमुक्त झाल्याचं बनावट कागदपत्र दाखविल्याचा आरोप केला. यानंतर तक्रारदाराने जयविरोधात तक्रार केली.