लग्नाच्या 11 दिवसांनंतर ‘बिग बॉस मराठी 3’ फेम जय दुधाणेला अटक; नेमकं काय आहे प्रकरण?
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा उपविजेता जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई एअरपोर्टवरून त्याला अटक केल्याचं समजतंय. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जय लग्नबंधनात अडकला होता. नेमकं काय प्रकरण आहे, ते जाणून घ्या..

मयुरेश जाधव, प्रतिनिधी: ‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता जय दुधाणेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जय दुधाणेला ठाणे पोलिसांनी अटक केल्याचं समजतंय. पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी जयला मुंबई विमानतळावरून अटक केली आहे. जय दुधाणे हा प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर, खेळाडू, मॉडेल आणि अभिनेता आहे. तो ठाण्याचा रहिवासी असून जिम व्यावसायिक आहे. जयने बनावट कागदपत्रे तयार करून काही दुकानं बेकायदेशीरपणे व्यक्तींना विकल्याचा आरोप आहे. यामुळे अनेक खरेदीदारांचं आर्थिक नुकसान झालं आहे. या प्रकरणात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये जय दुधाणे, त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह त्याचे आजोबा, आजी, आई आणि बहीण यांची चौकशी केली जात आहे. तपासादरम्यान आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे असं पोलिसांचं म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वीच जय लग्नबंधनात अडकला होता. 24 डिसेंबर 2025 रोजी जयने गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटीलशी लग्नगाठ बांधली होती. ठाण्यातच हा लग्नसोहळा पार पडला होता. जय दुधाणे सर्वांत आधी ‘स्पिट्सविला 13’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आला होता. या शोचं विजेतेपद त्याने पटकावलं होतं. त्यानंतर त्याने बिग बॉसम राठीच्या तिसऱ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता आणि इथे तो उपविजेता ठरला. तर विशाल निकमने या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. जयने काही मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. 2023 मध्ये तो ‘गडद अंधार’मध्ये झळकला. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ यामध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
लग्नाच्या 11 दिवसांनंतर जय दुधाणेला पोलिसांनी अटक केली आहे. हे फसवणूक प्रकरण नेमकं काय आहे, जयवर कोणते आरोप आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. जयची पत्नी हर्षला पाटील ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स असून फॅशन आणि ट्रॅव्हलसंदर्भातील व्हिडीओ ती पोस्ट करते. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचं लग्न पार पडलं.
