Salman Khan | सलमानचं कबीर खानसोबत भांडण? 6 वर्षांनंतर ‘एक था टायगर’च्या दिग्दर्शकाने सोडलं मौन

याच चित्रपटानंतर कबीर खान आणि सलमान खान यांच्यात वितुष्ट आल्याच्या चर्चांना उधाण आलं. या दोघांमध्ये मतभेद होते, अशीही चर्चा होती. या सर्व चर्चांवर सहा वर्षांनंतर आता कबीर खानने मौन सोडलं आहे.

Salman Khan | सलमानचं कबीर खानसोबत भांडण? 6 वर्षांनंतर एक था टायगरच्या दिग्दर्शकाने सोडलं मौन
Salman Khan and Kabir Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 31, 2023 | 7:57 PM

मुंबई: दिग्दर्शक कबीर खानने जेव्हा अभिनेता सलमान खानसोबत मिळून ‘एक था टायगर’सारखा सुपरहिट चित्रपट बनवला, तेव्हा सर्वांच्या नजरा या जोडीवर खिळल्या होत्या. त्यानंतर ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘ट्युबलाइट’ या आणखी दोन चित्रपटांसाठी या जोडीने एकत्र काम केलं. त्यापैकी ‘ट्युबलाइट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. याच चित्रपटानंतर कबीर खान आणि सलमान खान यांच्यात वितुष्ट आल्याच्या चर्चांना उधाण आलं. या दोघांमध्ये मतभेद होते, अशीही चर्चा होती. या सर्व चर्चांवर सहा वर्षांनंतर आता कबीर खानने मौन सोडलं आहे. सेटवर सलमानसोबत अनेकदा मतभेद असल्याचे आणि कधी वादही व्हायचे, असं कबीर म्हणाला.

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत कबीर म्हणाला, “कामाच्या बाबतीत माझं त्याच्याशी चांगलं नातं आहे. त्याच्यासोबत मिळून बनवलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना मला खूप मजा आली. सलमानकडे नेहमीच नवनवीन कल्पना असतात आणि अनेकदा तो सल्ले देतो. याकडे मी कधीच कामातील अडथळा म्हणून बघत नाही. मी त्याला जे सांगितलंय त्यावर सलमान विचार करतोय याचा मला आनंद आहे.”

सेटवर काम करताना झालेल्या मतभेदांविषयी त्याने पुढे सांगितलं, “असं अनेकदा झालं, जेव्हा आमच्यात मतभेद झाले. त्यावरून आमच्यात वादावादी व्हायची आणि त्यानंतर सलमान नाराज असायचा. पण त्यानंतर कधी मी त्याला समजवायला जायचो तर कधी तो मला समजवायचा. एक था टायगर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमच्यात बरेच मतभेद होते. सलमान मला म्हणायचा, हे बघ, मी सलमान खान आहे. मी 50 ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत आणि तू फक्त दोनच चित्रपट केले आहेत. तो भांडायचा आणि नाराजी व्यक्त करायचा. पण त्याने कधीच उद्धटपणा केला नाही.”

कबीर खान आणि सलमान खानने गेल्या सहा वर्षांत सोबत काम केलं नसलं तरी त्यांच्यातील नातं अजूनही मैत्रीपूर्ण आहे. केवळ एक चित्रपट सलमानसोबतचं नातं बिघडवू शकत नाही, असंही कबीर एका मुलाखतीत म्हणाला होता.