काजोलच्या आजीने गरोदर असताना साकारली होती सीता; झालेली प्रचंड टीका, थेट म्हणालेले ‘अपवित्र तमाशा’..

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' चित्रपटातील सीतेच्या भूमिकेवरून सध्या चर्चा सुरू आहे. मात्र, आजच्या आधी तब्बल 78 वर्षांपूर्वी अभिनेत्री शोभना समर्थ यांनी सीतेची भूमिका साकारताना अशाच वादाचा सामना केला होता.

काजोलच्या आजीने गरोदर असताना साकारली होती सीता; झालेली प्रचंड टीका, थेट म्हणालेले अपवित्र तमाशा..
साई पल्लवीच्या आधी 78 वर्षांपूर्वी काजोलची आजी बनली होती सीता
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2026 | 9:42 AM

सध्या बॉलिवूडमध्ये नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत, तर अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, साई पल्लवीच्या व्यक्तिरेखेवरून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सीतेला राक्षसांशी लढताना दाखवण्यावरून काहींनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, सीतेच्या भूमिकेवरून होणारा हा वाद काही पहिलाच नाही. आजपासून तब्बल 78 वर्षांपूर्वी अभिनेत्री शोभना समर्थ यांनाही सीतेची भूमिका साकारल्यामुळे अशाच टीकेचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या.

आठ महिन्यांची गर्भवती असताना साकारली सीतेची भूमिका

शोभना समर्थ या अभिनेत्री काजोल यांच्या आजी आहेत. 1942 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भरत मिलाप’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा सीतेची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1943 मध्ये आलेल्या ‘राम राज्य’ चित्रपटातही त्या सीतेच्या भूमिकेत दिसल्या. या दोन्ही चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. त्यामुळे सीता म्हटलं की शोभना समर्थ यांचा चेहरा प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येत असे. यानंतर 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामबाण’ चित्रपटातही त्यांना सीतेची भूमिका मिळाली. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्या आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. याच गोष्टीवरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता.

Loading...

‘अपवित्र तमाशा’ म्हणत केली होती टीका

‘फिल्म इंडिया’ या चित्रपटविषयक मासिकाचे संपादक बाबूराव पटेल यांनी शोभना समर्थ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला होता. गर्भवती महिलेने सीतेची भूमिका साकारणं धार्मिक भावनांच्या विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या मते, शोभना यांची गर्भावस्था सीतेच्या आदर्श प्रतिमेशी जुळणारी नव्हती. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या परीक्षणात या चित्रपटाला ‘आजारी आणि अपवित्र तमाशा’ असं संबोधलं होतं. शोभना यांच्या वयावर आणि शारीरिक ठेवणीवरही त्यांनी टीका केली होती. प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहू नये, इतकंच नव्हे तर त्यावर बहिष्कार टाकावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं.

या सगळ्या वादानंतरही शोभना समर्थ यांची सीतेच्या भूमिकेतील ओळख कायम राहिली. त्यांची नात आणि अभिनेत्री काजोल हिने एकदा त्यांचा उल्लेख ‘ओजी सीता’ (ओरिजिनल सीता) असा केला होता. शोभना समर्थ यांच्या कुटुंबात अभिनेत्री तनुजा आणि नूतन या त्यांच्या मुलींचाही समावेश आहे. तनुजा यांची मुलगी काजोल आणि तनीषा या दोघीही मनोरंजनविश्वातील परिचित अभिनेत्री आहेत. आज साई पल्लवीच्या सीतेच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या चर्चेच्या निमित्ताने शोभना समर्थ यांचा 78 वर्षांपूर्वीचा हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us