EPFO UPI PF: आता 20 दिवसाची प्रतिक्षा संपली, थेट UPI मधून खात्यात PF चा पैसा! पण ती अट काय?
EPFO UPI PF withdrawal: देशातील 8 कोटींहून अधिक ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. पीएफ काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे. पण काही अटी आणि शर्तींचे त्यांना पालन करावे लागेल असेही समोर येत आहे.

EPFO UPI PF withdrawal: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या 8 कोटींहून अधिक सदस्यांसाठी आनंदवार्ता आली आहे. पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि वेगवान होणार आहे. ईपीएफओच्या अहवालानुसार, पुढील महिन्यात, वर्षाअखेर युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) पीएफ रक्कम काढण्याची सुविधा सुरू होऊ शकते. या सुविधेनुसार, युपीआयद्वारे पैसे काढण्यासाठी एक अट असेल. त्यानुसार, युपीआयद्वारे किमान एक हजार रुपये पीएफ रक्कम काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात येईल. तर कमाल अट ही पीएफ नियमानुसार असेल.
वारंवार छोट्या रक्कमेसाठी विनंती नको
सदस्यांनी वारंवार अतिशय लहान रक्कमेसाठी विनंती करू नये यासाठी ईपीएफओ प्रणाली अद्ययावत करण्यात येत आहे. त्यामुळेच एक हजार रुपयांची किमान मर्यादा ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. युपीआय सुविधेसाठी तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. या सुविधेच्या दोन चाचण्याही यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. या चाचणीदरम्यान किरकोळ तांत्रिक त्रुटी समोर आल्या. त्या दूर करण्यात आल्या आहेत. नवीन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म सेंट्रलाईज्ड आयटी इनेबल्ड सिस्टिम 2.0 (CITIES 2.0) लवकरच कार्यान्वित होईल.
3 दिवसांपेक्षा कमी वेळेत क्लेम सेटलमेंट
EPFO 3.0 प्रकल्पातंर्गत ईपीएफओ मोठ्या डिजिटल सुधारणा होत आहे. कोर बँकिंग प्रणालीसारख्या सुविधा देण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे कागदपत्रांची पडताळणी अधिक सुलभ आणि जलद होतील. आवश्यक तपासणी आणि पडताळणी झटपट पूर्ण होईल. ही प्रक्रिया आता मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वंयचलित पद्धतीने झटपट पूर्ण होईल. क्लेम सेटलमेंटसाठीचा कालावधी 3 दिवसांपेक्षाही कमी होण्याची अपेक्षा आहे.
पीएफचे पैसे काढण्यासाठी सध्या ईपीएफओच्या पोर्टलवर जाऊन क्लेम करावा लागतो. पण एखाद्या चुकीमुळे खात्यात रक्कम जमा होण्यासाठी आठवडा ते दोन आठवडे लागतात. आता नवीन प्रक्रियेत ही सर्व प्रक्रिया कालबाह्य ठरली आहे. माहितीनुसार, ही सुविधा तुमचा UAN क्रमांक आणि UPI खात्याशी जोडलेली असेल. सुरुवातीला ही सुविधा BHIM प्लॅटफॉर्मवरून उपलब्ध होणार आहे.
तुमच्या खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. खात्यात किती रक्कम शिल्लकी ठेवावी लागेल आणि तुम्हाला किती रक्कम काढता येईल याची माहिती लागलीच कळेल. यापूर्वी पीएफमधून 25 टक्के आंशिक रक्कम काढता येत होती. खात्यात 75 टक्के रक्कम ठेवावी लागत होती. 19 नोव्हेंबरला ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक झाली. त्यानुसार, 90 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.
