Kangana Ranaut : देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो… कंगनाची रामदेव बाबांसाठी खास पोस्ट, भाऊ म्हणून उल्लेख; असं काय घडलं?
बाबा रामदेव आणि कंगना रानौत यांच्यात काही काळापासून विवाद सुरू होते, मात्र आता त्यांच्यातले मतभेद संपुष्टात आले आहेत. नेमकं काय घडलं ?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, तसेच भाजपच्या खासदार कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्यात गेल्या काही काळापासून चांगलाच वाद भडकला आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. कंगना यांनी ‘गटर पिढी’ असा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याचा रामदेव बाबांनी निषेध करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होते. त्यामुळे नाराज झालेल्या कंगना यांनीही योगगुरूवर जबरदस्त पलटवार केला. काही दिवसांपूर्वी सुरू झालेला हा वाद वाढतच चालला होता, मात्र अखेर आज रक्षाबंधनाच्या सणाच्या दिवशी या वादावर पडदा पडतान दिसत आहे.
वाद मिटवण्यात स्वामी रामदेव यांचा पुढाकार
नुकतीच हरिद्वारमधील एका कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी कंगना यांची आठवण काढली आणि खास संदेशही दिला. एवढंच नव्हे तर स्वामी रामदेव यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने कंगना यांच्यासोबतचा वाद विसरून तिला मिठाई आणि भेटवस्तूही पाठवल्या. विशेष म्हणजे, माध्यमांशी संवाद साधताना रामदेव यांनी स्वतः याची माहिती दिली आणि या वादावरही आपली भूमिका स्पष्ट केली. ‘ माझी (बहीण) कंगना रनौतला मी पोस्टाने गिफ्ट आणि मिठाई पाठवत आहे. कोणत्याही कारणामुळे द्वेष निर्माण होऊ नये आणि एकमेकांविषयी वैराची भावना असता कामा नये. त्यामुळे आम्ही वैराचा त्याग केला आहे’ असं त्यांनी म्हटलं. तसेच मिठाई आणि भेटवस्तू पाठवल्यानंतर कंगना यांना फोन करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही देणार असल्याचंही रामदेव यांनी नमूद केलं.
कंगना यांनीही स्वीकारलं मोठ्या भावाचं प्रेम
विशेष म्हणजे, बाबा रामदेव यांचा संदेश कंगना रानौत यांनीही मनापासून स्वीकारल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी, बाबा रामदेव यांना आपला मोठा भाऊ संबोधत इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्टही लिहीली. सणाचा दिवस हा झालेल्या चुका आणि गैरसमज विसरून सर्वांना माफ करण्यासाठी असतो. बाबा रामदेव यांनी “वाद नाही, तर संवाद झाला पाहिजे” असं सांगितंल, त्याबद्दल कंगना यांनी कौतुकही केलं. रक्षाबंधनाच्या दिवशी रामदेव यांनी पाठवलेली मिठाई आणि मोठ्या भावाचे प्रेम, दोन्ही आपण स्वीकारत असल्याचंही कंगना यांनी नमूद केलं. तसेच त्यांचे आभार मानत देव तुम्हाला दीर्घायुष्य देवो, अशा शुभेच्छाही कंगना यांनी दिल्या.