रणवीरवर इंडस्ट्रीत बंदी घातल्याप्रकरणी कंगना राणौत स्पष्टच म्हणाल्या, तुमचे शत्रू तर..
'डॉन 3' या चित्रपटातून अचानक माघार घेतल्याने FWICE ने रणवीर सिंहविरोधात असहकाराचे आदेश दिले. यावर आता अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कंगना यांनी रणवीरला खास सल्लासुद्धा दिला आहे.

फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून बाहेर पडल्यापासून अभिनेता रणवीर सिंह सतत चर्चेत आहे. शूटिंगच्या काही दिवस आधी अचानक या चित्रपटातून माघार घेणं रणवीरला चांगलंच महागात पडलं आहे. फरहानच्या तक्रारीनंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ने (FWICE) रणवीरविरोधात असहकाराचे आदेश जारी केले. म्हणजेच इंडस्ट्रीतल्या लोकांना रणवीरसोबत कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करण्यापासून रोखण्यात आलं आहे. या आदेशावर विविध सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या असून काहींनी रणवीरची बाजू घेतली आहे. अशातच अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांनीसुद्धा या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे.
काय म्हणाल्या कंगना राणौत?
कंगना सध्या त्यांच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशननिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्यांना रणवीरविरोधातील फेडरेशनच्या या आदेशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “हे पहा, जर तुम्ही मला विचारत असाल, तर माझ्यावर सगळ्यांनीच बंदी घातली आहे (हसतात). मी यावर इतकंच म्हणेन की जेव्हा तुमची प्रतिष्ठा वाढते, तेव्हा तुमचे शत्रूही वाढतात. असं होऊच शकत नाही की तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे शत्रू नसतील. तुमच्या विरोधकांची संख्या वाढते. पण त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नये.”
कंगना यांचा व्हिडीओ-
“माझ्यावर संपूर्ण इंडस्ट्रीने बंदी घातली होती. पण मी हार मानली नाही आणि आता मी ज्याठिकाणी आहे, तिथे खूप खुश आहे. त्याचप्रकारे रणवीरनेही याबद्दल फार विचार करू नये. हे जीवन असंच असतं आणि यात चढउतार येतच राहतात. तुम्हाला फक्त पुढे जाण्यावर लक्ष केंद्रीत करायचं असतं”, असा सल्ला त्यांनी रणवीरला दिला.
बंदीवर रणवीरची प्रतिक्रिया
फेडरेशनच्या आदेशानंतर रणवीरच्या प्रवक्त्याने या संपूर्ण प्रकरणी त्याची बाजू मांडत स्पष्ट केलं, “या चित्रपटसृष्टीचा आणि डॉन फ्रँचाइजीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा रणवीर खूप आदर करतो. याप्रकरणी त्याने जाणूनबुजून मौन बाळगलं होतं, कारण त्याच्या मते व्यावसायिक संवाद आणि वैयक्तिक नात्यांना प्रतिष्ठा, परिपक्वता आणि एकमेकांच्या सन्मानानेच सांभाळलं पाहिजे. वेळोवेळी त्याच्याबद्दल विविध चर्चा झाल्या, अंदाज व्यक्त करण्यात आले, पण रणवीरने कधीच सार्वजनिकरित्या उत्तर देण्याला किंवा अंदाजांना अधिक हवा देणं गरजेचं मानलं नाही. त्याचं संपूर्ण लक्ष कामावर आणि आगामी प्रोजेक्ट्सवर आहे.”