
प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आशिका रंगनाथच्या 22 वर्षीय चुलत बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 22 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. बेंगळुरूमधील पांडुरंगा नगर इथल्या एका नातेवाईकांच्या घरी तिने आपलं आयुष्य संपवल्याचं कळतंय. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या बॉयफ्रेंडकडून शारीरिक छळ झाल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं समजतंय. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, बॉयफ्रेंडविरोधात पुरावे असतानाही पोलिसांनी अद्याप कोणालाच अटक केली नसल्याचा दावा पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. आशिकाच्या चुलत बहिणीवर शारीरिक संबंधासाठी बॉयफ्रेंडकडून सतत दबाव आणला जात होता. जेव्हा तिने त्याला नकार दिला तेव्हा त्याने तिला छळायला सुरुवात केली.
आरोपीचं नाव मयांक असून तो दूरचा नातेवाईक असल्याचं म्हटलं जात आहे. जेव्हा पीडित मुलीने त्याला शारीरिक संबंधासाठी नकार दिला तेव्हा त्याने तिचा लैंगिक छळ, मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. मयांक हा ड्रग्ज घ्यायचा आणि नशेत पीडितेला सतत फोन करून त्रास द्यायचा. पीडित मुलगी ही अभिनेत्री आशिकाच्या मामाची मुलगी होती.
आशिकाची चुलत बहीण शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्याच्या तयारीत होती. त्यातच तिची ओळख मयांकशी झाली होती. मयांकने तिच्याशी प्रेमाचं नाटक करत लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. याला जेव्हा पीडितेनं नकार दिला तेव्हा मयांक तिला मारहाण करू लागला होता. या सर्व गोष्टींचा पीडित मुलीच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम झाला.
मयांककडून सतत होणाऱ्या छळाला वैतागून मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा आशिकाच्या काकीने केला. याप्रकरणी मयांक आणि त्याच्या आई मैना यांच्याविरोधात हासन सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्या मुलीच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या आरोपांनी तातडीने अटक करा, अशी मागणी पीडितेच्या पालकांनी केली आहे. याप्रकरणी अद्याप अभिनेत्री आशिकाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
सोमवारी आशिकाने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. आशिकाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘गत वैभवा’ या कन्नड चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातून एस. एस. दुश्यंतने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 14 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.