
झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. टी व्ही विश्वात करियर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने टोकाचं पाऊल उचललं आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी अभिनेत्रीने सुसाईड नोट लिहिली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने आई – वडिलांवर गंभीर आरोप केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने बेंगळुरू येथे आत्महत्या केली आहे. सध्या पोलीस याप्रकरणी चौकशी करत असून, अभिनेत्री मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अशात अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ‘जीवा हूवागिदे’, ‘संघर्ष’ आणि ‘गौरी’ या मालिकांमुळे अभिनेत्री यशाच्या शिखरावर पोहोचली.
कन्नड टीव्ही अभिनेत्री नंदिनीने बेंगळुरू येथील तिच्या घरी आत्महत्या केली. प्रसिद्ध टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री बेंगळुरूमध्ये राहत होती. ही घटना बेंगळुरूमधील आरआर नगरमध्ये घडल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 28 डिसेंबर 2025 ची रात्र 11.16 ते 29 डिसेंबर 2025 ची सकाळ 12.30 वा. दरम्यान घडल्याचं सांगण्यात येत आहे.
रिपोर्टनुसार, नंदिनी त्या संध्याकाळी तिचा मित्र पुनीतच्या घरी गेली आणि रात्री 11:23 वाजता तिच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत परतली आणि तिने आतून दरवाजा बंद केला. पुनीतने तिला फोन केला तेव्हा तिच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही. फोनवर बोलणं न झाल्यामुळे पुनीत याला चिंता वाटू लागली. ज्यामुळे त्याने पीजी मॅनेजर कुमारला याबद्दल सांगितलं…
त्यानंतर दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांना नंदिनी तिच्या खोलीत मृत अवस्थेत आढळली. केंगेरी पोलिसांना कळवण्यात आले आणि बल्लारीहून बेंगळुरूला आलेल्या तिच्या कुटुंबियांना कळवण्यात आलं. तर सुसाईड नोटमध्ये तिने आई – वडिलांवर गंभीर आरोप केले आहेत.
सुसाईड नोटमध्ये नंदिनी म्हणाली, आई – वडील सतत तिच्यावर लग्न करण्याचा दबाव टाकत होते. पण ती लग्नासाठी तयार नव्हती.. शिवाय काही खासगी कारणांमुळे ती डिप्रेशनमध्ये होती… असं देखील नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. तर पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.