‘कांतारा 2’साठी तब्बल 600 लोकांनी ‘या’ ठिकाणी तयार केला भव्य सेट

ऋषभ शेट्टी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून तोच यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. 'कांतारा'च्या पहिल्या भागाने 'केजीएफ-चाप्टर 1' आणि 'केजीएफ- चाप्टर 2' या दोन्ही चित्रपटांना चांगली टक्कर दिली होती. हिंदी आणि तेलुगू व्हर्जनलाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.

कांतारा 2साठी तब्बल 600 लोकांनी या ठिकाणी तयार केला भव्य सेट
Kantara 2
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2024 | 3:29 PM

होम्बले फिल्म्स हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत मोठ्या प्रॉडक्शन हाऊसपैकी एक आहे. या प्रॉडक्शन हाऊसने आतापर्यंत ‘केजीएफ: चाप्टर 2’, ‘अ लेजंड’, ‘सलार: पार्ट 1’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता या निर्मिती संस्थेचा सर्वांत मोठा प्रोजेक्ट ‘कांतारा: चाप्टर 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगला एका आठवड्यात सुरूवात होणार आहे. हा 20 दिवसांचा शूटिंग शेड्युल असेल. या शेड्युलमध्ये चित्रपटाची टीम जंगलात शूट करणार आहे. कुंडपुराच्या सागरी किनाऱ्यालगत शूटिंगसाठी जागा निवडण्यात आली आहे.

यासाठी 200X200 फूटचा सेट तयार करण्यात आला आहे. कुंडपुरामध्ये हा सेट तयार करण्यासाठी मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबादहून 600 लोकांना बोलावण्यात आलं आहे. स्टंट मास्टर्सच्या देखरेखीखाली चित्रपटाचे काही सीन्स शूट केले जाणार आहेत. त्यासाठी कलाकारांना विशेष प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. या दुसऱ्या भागाचंही दिग्दर्शन ऋषभ शेट्टी करणार असून तोच यात मुख्य भूमिकेत असेल.

‘कांतारा’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली होती. या चित्रपटातील काही सीन्सचं प्रेक्षक-समीक्षकांकडून प्रचंड कौतुक झालं होतं. त्यामुळे ‘कांतारा’च्या दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे हा दुसरा भाग प्रीक्वेलच्या रुपात प्रदर्शित होणार आहे. ‘कांतारा’ हा मूळ कन्नड भाषेतील सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. त्या शब्दाचा अर्थ रहस्यमयी जंगल असा होतो. जंगलच्या देवतेला कन्नड भाषेत ‘कांतारे’ म्हटलं जातं. त्यावरून या चित्रपटाचं नाव ‘कांतारा’ असं देण्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये या वनदेवतेला खूप महत्त्व आहे. त्यांची वेशभूषा करून लोकनृत्य सादर केले जातात.

कांतारा हा चित्रपट सर्वांत आधी कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता. जेव्हा या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळू लागला, तेव्हा इतर भाषांमध्ये त्याचं डबिंग करण्यात आलं होतं. अवघ्या 20 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला होता.