‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिन्ही सिझनमधून तब्बल इतकी कमाई; पहिल्या 13 एपिसोडसाठी कॉमेडियनला मिळालं इतकं मानधन

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा तिसरा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोच्या तिन्ही सिझनसाठी कॉमेडियन कपिल शर्माला तगडं मानधन मिळालं आहे. पहिल्या 13 एपिसोड्ससाठी त्याला किती कोटी रुपये मिळाले होते, ते जाणून घेऊयात..

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या तिन्ही सिझनमधून तब्बल इतकी कमाई; पहिल्या 13 एपिसोडसाठी कॉमेडियनला मिळालं इतकं मानधन
Kapil Sharma
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2025 | 12:38 PM

कपिल शर्माने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सिझनद्वारे जबरदस्त कमबॅक केलं आहे. या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खान प्रमुख पाहुणा बनून आला होता. यामध्ये त्याने त्याच्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. यंदाच्या सिझनमध्ये नवज्योत सिंग सिद्धू हेसुद्धा शोमध्ये झळकले. या सिझनची घोषणा झाल्यापासूनच त्यातील कलाकारांच्या मानधनाविषयी चर्चेला सुरुवात झाली होती. नवज्योत सिंग सिद्धू, अर्चना पुरण सिंह, कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर यांना किती फी देण्यात आली, याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या शोमधून कपिलने किती कमाई केली, त्याचीही माहिती समोर आली आहे.

‘द सियासत डेली’च्या एका रिपोर्टनुसार, कपिल शर्माने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या तिसऱ्या सिझनच्या प्रत्येक एपिसोडसाठी 5 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. याआधीच्या दोन्ही सिझनमध्येही त्याने प्रत्येक एपिसोडसाठी तेवढंच मानधन स्वीकारलं होतं. या रिपोर्टनुसार, कपिलने ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या पहिल्या सिझनमधून 65 कोटी रुपये कमावले होते. या पहिल्या सिझनमध्ये एकूण 13 एपिसोड्स होते. दुसऱ्या सिझनमध्येही तेवढ्याच एपिसोड्सचा समावेश होता आणि तेव्हासुद्धा कपिलने 65 कोटी रुपये कमावले होते. आता तिसऱ्या सिझनमध्येही 13 एपिसोड्स असतील, असं म्हटलं जातंय. त्यामुळे शोच्या तिन्ही सिझनमध्ये कपिल शर्माने एकूण 195 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

कपिल शर्माच्या करिअर आणि कमाईबद्दल बोलायचं झाल्यास, त्याचा पहिला पगार फक्त 500 रुपये होता. आता त्याची एकूण संपत्ती तब्बल 300 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं म्हटलं जातं. मुंबई आणि अमृतसरमध्ये त्याची आलिशान घरं आहेत. त्याला महागड्या गाड्यांचीही आवड आहे. कपिलने त्याच्या करिअरमध्ये बराच संघर्ष केला होता. स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर त्याने इतकी प्रसिद्धी कमावली आहे.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या सिझनमध्ये कपिलचा नवीन लूकसुद्धा पहायला मिळतोय. त्याने बरंच वजन घटवलं आहे. लॉकडाऊननंतर कपिलने त्याच्या फिटनेसकडे अधिक लक्ष दिलंय. 2020 मध्ये शूटिंगदरम्यान त्याने जवळपास अकरा किलो वजन कमी केल्याचा खुलासा केला होता.