Bhushan Thakre: योग्य उत्तर, पण हुकले 7 कोटी! जळगावच्या भूषण ठाकरेला विचारला होता हा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहितीये का?
KBC Bhushan Thakre: जळगावचा भूषण ठाकरे हा 'कौन बनेगा करोडपती 18'मध्ये हॉटसीटवर बसला होता. त्याने 1 कोटी रुपये जिंकले. पण 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती असून देखील पैसे जिंकता आले नाहीत.

बुद्धीमत्तेच्या जोरावर कोट्यवधी रुपये जिंकण्याची संधी कौन बनेगा करोडपती या शोच्या माध्यमातून देण्यात येते. अनेकजण या शोमध्ये येतात आणि लाखो रुपये जिंकतात. नुकताच या शोमध्ये जळगावचा मराठमोळा भूषण ठाकरे हॉट सीटवर बसला होता. त्याने बुद्धीमत्तेच्या जोरावर एक कोटी रुपये जिंकले. पण 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती असूनही त्याची पैसे जिंकण्याची संधी हुकली आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल का? चला जाणून घेऊया काय होता प्रश्न…
भूषण ठाकरे हा ‘कौन बनेगा करोडपती 18’चा पहिला करोडपती ठरला आहे. पण 1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्यानंतर त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने संयमाने 1 कोटी रुपयापर्यंत खेळी केली पण 7 कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाने मात्र खळबळ उडवली.
‘कौन बनेगा करोडपती 18’मध्ये भूषणला 16व्या प्रश्न काय होता?
“ब्रिटिश भारतातील 20 कोटींहून अधिक लोकांद्वारे बोलल्या जाणाऱ्या 179 भाषा आणि 544 बोलीभाषांचे सर्वेक्षण जॉर्ज ए. ग्रियर्सन यांनी तीन दशकांच्या कालावधीत पूर्ण केले; त्यांनी हे सर्वेक्षण कोणत्या इंग्रजी शहरातून केले होते?” असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नासाठी A. हॅरिस, B. ग्रॉसम, C. ऑक्सफर्ड आणि D. कॅम्बरली असे पर्याय देण्यात आले होते. पण या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती असूनही 1 कोटी गमावण्याच्या भीतीने भूषणने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्याकडे ‘फिफ्टी-फिफ्टी’ ही लाइफलाइन शिल्लक होती, परंतु ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या नियमांनुसार, ७ कोटी रुपयांच्या प्रश्नासाठी कोणतीही लाइफलाइन वापरण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करुन त्याने 7 कोटी रुपयांच्या प्रश्नासाठी उत्तर न देण्याचा निर्णय घेतला.
खेळ सोडल्यावर दिले प्रश्नाचे योग्य उत्तर
1 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर दिल्यानंतर भूषणने खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. पण अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर विचारताच भूषणने ‘कॅम्बरली’ असे म्हटले. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पण सुरक्षित खेळण्याच्या हेतूने त्याने 7 कोटी रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर न देता खेळ सोडला. भूषणने बक्षिस गमावल्यानंतर अमिताभ बच्चनही थक्क झाले.