KGF फेम अभिनेत्याचं निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

'केजीएफ'मधील अभिनेते कृष्णा जी राव काळाच्या पडद्याआड; कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा

KGF फेम अभिनेत्याचं निधन; रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
KGF फेम अभिनेत्याचं निधन
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 08, 2022 | 7:54 AM

बेंगळुरू: केजीएफ या सुपरहिट चित्रपटात भूमिका साकारलेले अभिनेते कृष्णा जी राव यांचं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. रिपोर्ट्सनुसार ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. बेंगळुरूमधील विनायक रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृष्णा जी राव यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती नेमकी कशामुळे बिघडली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. कृष्णा जी राव हे साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत कलाकार होते. केजीएफ शिवाय त्यांनी इतरही लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती.

कृष्णा यांनी KGF चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षक – समिक्षकांकडून कौतुक झालं होतं. केजीएफ चित्रपटाच्या चाहत्यांना त्यांची भूमिका चांगलीच लक्षात असेल. कारण कृष्णा यांनी तीच भूमिका साकारली होती, ज्यामुळे रॉकीची ओळख होते. तीच वृद्ध व्यक्ती ज्यामुळे यश म्हणजेच रॉकीला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते.

कृष्णा जी राव हे त्यांच्या नातेवाईकांकडे जात होते, त्याचवेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यांनतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केजीएफ चित्रपटाच्या प्रॉडक्शन कंपनीने ट्विट करत कृष्णा यांच्या निधनाची माहिती दिली.

केजीएफ या मूळ कन्नड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागालाही देशभरात प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षकांना केजीएफच्या तिसऱ्या भागाची उत्सुकता आहे.