सरळ हिंदी चॅनलवर फिरवा हा शो… माधुरी दीक्षितच्या ‘कोण होणार करोडपती’वर भडकले नेटकरी, नेमकं काय घडलं?

सोनी मराठीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. यंदाच्या पर्वावर अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर काहींनी तर हा शो हिंदी चॅनेलवर सुरू करण्याचा सल्लाही दिला आहे.

सरळ हिंदी चॅनलवर फिरवा हा शो... माधुरी दीक्षितच्या कोण होणार करोडपतीवर भडकले नेटकरी, नेमकं काय घडलं?
माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'वर भडकले नेटकरी
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 26, 2026 | 10:19 AM

Kon Honaar Crorepati: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘कोण होणार करोडपती’ सध्या प्रेक्षकांच्या नाराजीचा सामना करत आहे. सामान्य माणसाच्या ज्ञानाला आणि बुद्धिमत्तेला व्यासपीठ मिळवून देणारा कार्यक्रम म्हणून या शोची ओळख आहे. मात्र, यंदाच्या पर्वात कार्यक्रमाचा मूळ उद्देश बाजूला पडत असल्याची भावना काही प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या पर्वाचं सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित करत आहे. यंदाच्या पर्वात हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. आतापर्यंत अभिनेत्री फराह खान, यामी गौतम, रवीना टंडन, भोजपुरी अभिनेता रवी किशन आणि प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर भुवन बाम यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कलाकारांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळी झळाळी मिळाली असली, तरी मराठी प्रेक्षकांना मात्र ही गोष्ट फारशी रुचलेली नाही.

एका मराठी कार्यक्रमात हिंदी आणि भोजपुरी मनोरंजनविश्वातील कलाकारांना वारंवार बोलावण्यापेक्षा मराठी कलाकारांना अधिक संधी द्यायला हवी, अशी भावना प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे. तसंच या कार्यक्रमात सामान्य मराठी स्पर्धकांच्या संघर्षकथा आणि त्यांच्या ज्ञानाला अधिक महत्त्व मिळायला हवं, असंही अनेकांचं म्हणणं आहे. कार्यक्रमाचे प्रोमो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. एका नेटकऱ्याने, ‘अरे सोनी मराठीवर कशाला सुरू केला मग शो?’ असा सवाल केला आहे. तर दुसऱ्या युजरने, ‘कार्यक्रम मराठी आणि सगळे हिंदी, भोजपुरी कलाकार बोलवत आहात. बंद करा शो किंवा हिंदी चॅनेलवर फिरवा हा शो’, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Loading...

पहा व्हिडीओ-

काही प्रेक्षकांच्या मते, हा कार्यक्रम आता सामान्य माणसाच्या स्वप्नांना व्यासपीठ देण्याऐवजी हिंदी चित्रपटांच्या प्रमोशनचं माध्यम बनत चालला आहे. त्यामुळे निर्मात्यांनी कार्यक्रमाच्या मूळ संकल्पनेकडे लक्ष द्यावं, अशी मागणी होत आहे. यापूर्वी ‘कोण होणार करोडपती’चं सूत्रसंचालन अभिनेते सचिन खेडेकर, स्वप्नील जोशी आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं होतं. त्या पर्वांमध्ये सामान्य स्पर्धकांचे संघर्ष, त्यांचे अनुभव आणि ज्ञानाचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत होता. त्यामुळे यंदाच्या पर्वात सेलिब्रिटी पाहुण्यांची वाढती संख्या पाहून जुन्या पर्वांची आठवण काढली जात आहे.

दरम्यान, माधुरी दीक्षितसारखी लोकप्रिय अभिनेत्री या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असल्यामुळे सुरुवातीला प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, आता पाहुण्यांच्या निवडीवरूनच कार्यक्रमाला टीकेचा सामना करावा लागत आहे. प्रेक्षकांच्या या नाराजीनंतर निर्माते आगामी भागांमध्ये मराठी कलाकार आणि सामान्य स्पर्धकांना अधिक प्राधान्य देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us