
देशविदेशातील कानाकोपऱ्यातून असंख्य लोक वृंदावनमध्ये राहणाऱ्या प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून क्रिकेटर्सपर्यंत अनेक प्रसिद्ध स्टार्स त्यांच्या भेटीला जात असतात. विराट कोहली-अनुष्का शर्मा, शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा, बी प्राक, राजपाल यादव यांसारखे सेलिब्रिटी प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावनला पोहोचले होते. नुकतंच प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनीसुद्धा त्यांचं दर्शन घेतलं. कुमार सानू प्रेमानंद यांच्या आश्रमात पोहोचताच त्यांच्या टीमने त्यांची ओळख करून दिली. गायनश्रेत्रातील त्यांच्या कारकिर्दीविषयी महाराजांना माहिती देण्यात आली. कुमार सानू यांनी आजवर 27 हजार गाणी गायली असून ते 1990 पासून सक्रिय असल्याचं सांगण्यात आलं. सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून त्यांचा सन्मान केल्याचीही माहिती देण्यात आली.
कुमार सानू प्रेमानंद महाराजांसमोर हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात, “मला तुमचं दर्शन मिळालं, बस्स! मी फक्त तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो आहे. कृपया मला तुमचा आशीर्वाद द्या, जेणेकरून मी जे काम करतोय, ते यापुढेही करत राहू शकेन.” यावेळी महाराजांनी त्यांना जो सल्ला दिला, तो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. प्रेमानंद महाराज त्यांना म्हणाले, “हे पाहा.. तुम्ही पूर्वी काही चांगले कर्म आणि तप केले असतील, ज्यामुळे आज तुम्हाला इतकी लोकप्रियता मिळाली आहे. ही काही छोटी बाब नाही. तुम्ही सार्वजनिक पातळीवर तुमचा अधिकार निर्माण केला आहे. आपले भारतीय आणि इतर जे कोणी प्रियजन आहेत, त्यांचे सदवचन तुमच्या वाणीत आहेत. हे पूर्वजन्मातील चांगल्या कर्माचं फळ आहे. आता तुम्ही असं काही करा, ज्यामुळे यापेक्षा खाली येणार नाही.”
“तुम्ही असं भजन, असं पुण्य, असं सामाजिक कार्य करा.. ज्यामुळे पुन्हा तुमचा भारतात जन्म होवो आणि पुन्हा तुम्हाला एवढं यश मिळो. यापेक्षा खालच्या पातळीवर जगणं योग्य नाही. इतकं प्रसिद्ध झाल्यानंतर जर आपली गती बिघडत असेल तर ते ठीक नाही. आता जर आपला पुनर्जन्म झाला तर तो मनुष्य रुपातच व्हावा आणि समाजसेवेसाठी व्हावा, तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटलं”, असं ते पुढे म्हणतात. त्यानंतर कुमार सानू त्यांच्यासमोर ‘जब कोई बात बिगड जाए’ हे गाणं गातात. प्रेमानंद महाराजसुद्धा अत्यंत आनंदाने हे गाणं ऐकतात. “हे गाणं आपण सर्वांसाठी गाऊ शकतो. आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी.. कोणासाठीही हे समर्पित होऊ शकतं”, असं कुमार सानू सांगतात.
गायक कुमार सानू गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्न, अफेअर आणि पूर्व पत्नीमुळे चर्चेत आहेत. अभिनेत्री कुनिका सदानंदने बिग बॉसच्या घरात कुमार सानू यांच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर त्यांची पूर्व पत्नी रीटा भट्टाचार्य यांनी त्यांच्या फसवणुकीसह इतर अनेक आरोप केले होते. या सर्व परिस्थितीत ते मानसिक शांतीसाठी प्रेमानंद महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचल्याचं म्हटलं जात आहे.