23 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर अखेर मराठमोळ्या अभिनेत्रीचं 41 व्या वर्षी लग्न

'क्योंकी सास भी..' या मालिकेत भूमिका साकारलेल्या या अभिनेत्रीने वयाच्या 41 व्या वर्षी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या 23 वर्षांपासून ती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अखेर वृंदावनमध्ये या दोघांनी लग्न केलंय.

23 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर अखेर मराठमोळ्या अभिनेत्रीचं 41 व्या वर्षी लग्न
अश्लेषा सावंत, संदीप बसवाना
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 24, 2025 | 12:28 PM

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंत अखेर लग्नबंधनात अडकली आहे. लिव्ह-इन पार्टनर आणि प्रियकर संदीप बसवानाशी तिने लग्न केलंय. हे दोघं गेल्या 23 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. 16 नोव्हेंबर रोजी वृंदावनमधल्या चंद्रोदय मंदिरात या दोघांनी छोटेखानी लग्न केलं. या लग्नाला केवळ दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. “अश्लेषा आणि मी एप्रिल महिन्यात वृंदावनला गेलो होतो आणि तिथल्या राधा-कृष्ण मंदिराशी आम्हाला गहिरं नातं जाणवलं. त्या प्रवासाने आम्हाला 23 वर्षे सोबत राहिल्यानंतर लग्न करण्यासाठी प्रेरित केलं”, असं संदीपने ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

याविषयी संदीप पुढे म्हणाला, “या लग्नामुळे आमचे आईवडील फार खुश आहेत. बऱ्याच काळापासून ते या क्षणाची प्रतीक्षा करत होते. आम्हाला हे लग्न अत्यंत साधेपणाने करायचं होतं आणि भगवान कृष्ण यांच्या मंदिरात लग्न करण्यापेक्षा उत्तम आणखी काय असू शकतं?” अश्लेषा आणि संदीप या दोघांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘अन् अखेर याप्रकारे आम्ही मिस्टर आणि मिसेसच्या रुपात आमच्या आयुष्याच्या नव्या अध्यायात पदार्पण केलं. परंपरांनी आमच्या हृदयात स्थान बनवलं आहे. सर्वांच्या आशीर्वादासाठी आम्ही कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो’, असं त्यांनी या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यावेळी दोघांनी गुलाबी रंगसंगतीचा पोशाख परिधान केला होता.

याविषयी अश्लेषा म्हणाली, “मी माझ्या प्रेमाशीच लग्न केलं, याचा मला अत्यंत आनंद आणि समाधान आहे. या लग्नासाठी वृंदावन हीच योग्य जागा होती. कारण त्या जागेशी आम्हाला खूप गहिरं नातं जाणवलं. आम्ही लग्नाचा निर्णय अचानकच घेतला आणि फक्त कुटुंबीयांनाच त्याबद्दल सांगितलं होतं.” यानंतर संदीप मस्करीत म्हणतो, “इतकी वर्षे एकत्र राहूनसुद्धा आम्ही लग्न का करत नाहीये, याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं देऊन आम्ही थकलो होतो (हसतो). माझ्या मनात मी आणि अश्लेषा नेहमीच विवाहित होतो. मला काही वेगळं जाणवत नाहीये. ही एक अशी गोष्ट होती, जी आम्ही कधीतरी करणारच होतो आणि अखेर तो दिवस उजाडला आहे. आम्ही दोघं खूप खुश आहोत.”

अश्लेषा सध्या ‘झनक’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर संदीपने ‘अपोलीना’ या मालिकेत काम केलं होतं. 2002 मध्ये ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. अश्लेषा 41 वर्षांची असून संदीप तिच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे.