
निर्माती एकता कपूरची ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ ही मालिका तुफान गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. यामध्ये मिहिरची भूमिका साकारून अभिनेता अमर उपाध्यायला प्रचंड लोकप्रियता मिळाली. गेल्या तीन दशकांपासून तो मालिका आणि चित्रपटसृष्टीत काम करतोय. परंतु ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या मालिकेमुळे त्याला सर्वाधिक स्टारडम मिळालं. परंतु प्रसिद्धीच्या शिखरावर असताना चित्रपटात पदार्पण करण्यासाठी त्याने मालिकेला निरोप दिला होता. या निर्णयाचा पश्चात्ताप अमरला आजसुद्धा होतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला.
‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ ही मालिका सोडल्यानंतर अमिरने 2003 मध्ये ‘दहशत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. त्यानंतर त्याने ‘धुंध : द फॉग’, ‘एलओसी कारगिल’ आणि ’13B’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. परंतु मालिकेतून अमरला जितकी प्रसिद्धी मिळाली, तितकी चित्रपटांमधून मिळाली नव्हती. “क्योंकी सास भी कभी बहु थी ही मालिका सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. त्यावेळी माझ्या हातात बरंच काम होतं”, असं तो ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता.
“त्यावेळी माझ्या हातात तीन चित्रपट होते आणि सहा प्रोजेक्ट्समध्ये मी मुख्य भूमिकेत होतो. त्यावेळी मी खूप लोभी कलाकार बनलो होतो. मला इतका लोभी व्हायला नको होता. आज मी त्या निर्णयांचा विचार करतो तेव्हा मला खूप पश्चात्ताप होतो. आज मला विचारलं तर मी असं म्हणेन की मी ती मालिका सोडली नसती. चित्रपटांच्या ऑफर्सना प्रतीक्षा करायला सांगितलं असतं”, अशा शब्दांत अमरने भावना व्यक्त केल्या होत्या.
2000 मध्ये ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ ही मालिका असंख्य प्रेक्षकांची सर्वांत आवडती मालिका होती. अमरने या मालिकेचा निरोप घेतल्यानंतर त्यात मिहिर या भूमिकेचं अपघातात निधन झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे त्यावेळी प्रेक्षक खूप नाराज झाले होते. अनेकांनी अमरला पुन्हा मालिकेत घेण्याची विनंती केली होती. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिक्रियांमुळे बालाजी टेलिफिल्म्स या निर्मिती संस्थेचा ई-मेल सर्व्हर क्रॅश झाला होता आणि फोन लाइनसुद्धा जॅम झाली होती. अखेर निर्मात्यांनी मालिकेत पुन्हा मिहिरच्या भूमिकेला आणण्याचा निर्णय घेतला.