“तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही”; लक्ष्मीकांत बेर्डेंनी शेवटच्या क्षणी सचिन पिळगावकर-अशोक सराफ नाही, तर या खास दोस्तांची काढली आठवण

मराठी रंगभूमी, मराठी सिनेसृष्टी ते हिंदी सिनेसृष्टीतही आपलं खास स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. आजही त्यांचा अभिनय आणि त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत. पण तुम्हाला माहितीये का कि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी शेवटच्या क्षणांमध्ये आपल्या त्या दोन जीवलग मित्रांची आठवण काढली होती. कोण आहेत ते कलाकाल?

तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही; लक्ष्मीकांत बेर्डेंनी शेवटच्या क्षणी सचिन पिळगावकर-अशोक सराफ नाही, तर या खास दोस्तांची काढली आठवण
Lakshmikant Berde
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 17, 2025 | 1:27 PM

मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी ते हिंदी सिनेसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण करणारा आणि आजही लोकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डेंच नाव आजही त्याच प्रेमाने आणि आपुलकीनं घेतलं जातं. ते या जगात आता नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र कायम आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘हमाल दे धमाल’, झपाटलेला यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

हे दोन कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेंचे जीवलग मित्र

लक्ष्मीकांत बेर्डेंना सर्वजण लाडाने लक्ष्या म्हणतात. लक्ष्याच्या अनेक सिनेमांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. लक्ष्याची कमी आजही मराठी मनोरंजन विश्वाला जाणवते. फक्त अभिनयच नाही तर ते एक माणूस म्हणूनही तेवढेच समृद्ध होते. तर मित्र म्हणूनही ते सर्वांचे लाडके. लक्ष्या म्हटलं की त्यांच्यासोबत नाव यायचं ते सचिन पिळगावकर, अशोक सराफ, महेश कोठारे यांचं. हे तिघेही त्यांचे चांगले मित्र होतेच पण त्यांचे जीवाभावाचे मित्र मात्र दुसरेच दोन कलाकार होते. ते दोन कलाकार म्हणजे अभिनेते चेतन दळवी आणि विजय चव्हाण.

“तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही माझ”

एका मुलाखतीत चेतन दळवींनीच लक्ष्मीकांत बेर्डेंविषयीचा एक भावुक किस्सा सांगितला होता. चेतन आणि लक्ष्या यांनी अनेक मराठी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. चेतन यांनी मुलाखतीत सांगितलं की, “लक्ष्याबरोबर कोणतीही भूमिका असो, मी करायला तयार असायचो. लक्ष्या जायच्या आधी मी त्याला भेटायला गेलो. ‘काय रे, कसा आहेस?’ अशी मी लक्ष्याची विचारपूस केली. तेव्हा लक्ष्या मला म्हणाला, ‘तुम्ही दोघंच माझे.’ त्यावेळी त्याने माझं आणि विजय चव्हाणचं नाव घेतलं. ‘तुम्ही दोघंच, बाकी कोण नाही माझं.’ असं लक्ष्या मला म्हणाला. मी लक्ष्याला म्हटलं, ‘वेडा आहेस तू. आधी सांगायचं ना आम्हाला, काय होतंय ते! त्याने स्वतःचे फार हाल करुन घेतले होते.”

नाटकांपासून ते अनेक चित्रपटांमध्ये या कलाकारांनी केलं एकत्र काम

चेतन दळवी आणि लक्ष्या यांनी एकत्र अनेक नाटकांमध्ये काम केलं. ‘टूरटूर’ नाटकात चेतन आणि लक्ष्याने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर ‘हमाल दे धमाल’, ‘फेका फेकी’ अशा सिनेमांमध्ये दोघांनी काम केलं. चेतन आणि लक्ष्या यांची विनोदी जुगलबंदी रंगभूमी आणि सिनेमांमध्ये प्रचंड गाजली. आजही चेतन त्यांचा खास मित्र आणि सहकलाकार लक्ष्याची आठवण काढतात.

आजही सर्वांच्या मनात लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण कायम

जरी हे दोघं कलाकार म्हणून प्रसिद्ध होते, तरी त्यांच्या नात्यातली मैत्री खरी होती. लक्ष्मीकांत बेर्डेंनी शेवटच्या क्षणांमध्ये त्यांच्या या दोन मित्रांची आवर्जून आठवण काढली. आज लक्ष्या आपल्यात नसले, तरी चाहत्यांच्या मनात अजून एक कोपऱ्यात त्यांच्या आठवणी आहेत.