53 वर्षांपूर्वीचं लता मंगेशकर यांचं गाणं पुन्हा चर्चेत; ईशा मालवीयच्या हिप-हॉप स्टाइलने सोशल मीडियावर उडवली धूम
एकीकडे जुन्या गाण्यांची जादू कायम असताना दुसरीकडे त्यांना नव्या पिढीच्या आवडीनुसार सादर करण्याचे प्रयोग सुरू आहेत. ईशा मालवीयच्या 'मैं तेरे इश्क में 2.0' या गाण्यामुळे पुन्हा एकदा लता मंगेशकर यांच्या अजरामर गाण्याची आठवण ताजी झाली आहे.

सोशल मीडियावर कधी कोणतं गाणं ट्रेंड होईल, याचा नेम नसतो. जुन्या गाण्यांना नवा साज देऊन पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा ट्रेंड सध्या चांगलाच लोकप्रिय होत आहे. असंच एक 53 वर्षांपूर्वीचं गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे, हे गाणं म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘मैं तेरे इश्क में’ या गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये अभिनेत्री ईशा मालवीय दिसत असून तिच्या हिप-हॉप स्टाइलमधील डान्सची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
काय आहे या गाण्याचं खास आकर्षण?
‘मैं तेरे इश्क में 2.0’ असं या नव्या गाण्याचं नाव आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये हे गाणं प्रदर्शित झालं. गायक दानिश अल्फाज आणि प्रसिद्ध रॅपर बोहेमिया यांनी या गाण्याला नवा अंदाज दिला आहे. जुन्या रोमँटिक गाण्यात देसी हिप-हॉप आणि रॅपचा तडका देण्यात आला आहे. या म्युझिक व्हिडीओमध्ये अभिनेत्री ईशा मालवीय मुख्य भूमिकेत दिसते. तिचा डान्स, स्टाइल आणि वेगवेगळे लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे, जुन्या गाण्याची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याला आधुनिक संगीताची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या गाण्यांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसोबतच नव्या पिढीलाही हा प्रयोग आकर्षित करत आहे. सोशल मीडियावर या गाण्याच्या इन्स्टाग्राम रील्स आणि व्हिडीओंची चर्चा सुरू आहे.
पहा गाणं-
53 वर्षांपूर्वी धर्मेंद्र आणि मुमताज यांच्यावर झालं होतं चित्रीकरण
या गाण्याचा इतिहासही तितकाच रंजक आहे. ‘मैं तेरे इश्क में’ हे मूळ गाणं 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लोफर’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात धर्मेंद्र आणि मुमताज मुख्य भूमिकेत होते. या दोघांवरच हे रोमँटिक गाणं चित्रित करण्यात आलं होतं. बागेतील सुंदर वातावरणात चित्रित झालेल्या या गाण्यात मुमताज आपल्या नाराज प्रियकराची समजूत काढताना दिसतात. या गाण्याला लता मंगेशकर यांनी आपला सुरेल आवाज दिला होता. गीतकार आनंद बक्षी यांनी या गाण्याचे बोल लिहिले होते, तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलं होतं. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. ‘लोफर’ चित्रपटाचं संगीत त्या काळात विशेष गाजलं होतं. या चित्रपटात लता मंगेशकर यांच्या ‘मैं तेरे इश्क में’ या गाण्याशिवाय मोहम्मद रफी यांचं ‘आज मौसम बड़ा बेईमान है’ आणि आशा भोसले यांचं ‘कोई शहरी बाबू’ ही गाणीही लोकप्रिय झाली होती.