
आंतरधर्मीय लग्न आजही खुल्या मनाने अनेकांकडून स्वीकारलं जात नाही. अनेक सेलिब्रिटींना त्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं आहे. किंबहुना आजसुद्धा आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांना प्रचंड ट्रोल केलं जातं. बॉलिवूडमध्येही काम केलेल्या एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला अशाच काही गोष्टींचा सामना करावा लागला. अभिनेत्री प्रियामणीने 2017 मध्ये चित्रपट निर्माता मुस्तफा राजशी लग्न केलं. प्रियामणी ही हिंदू ब्राह्मण कुटुंबातील असून मुस्तफा मुस्लीम आहे. या कारणामुळे ही जोडी सतत टीकाकारांच्या निशाण्यावर होती. प्रियामणीला ‘लव्ह जिहाद’सारख्या गंभीर टीकांनाही सामोरं जावं लागलं. काहींनी तर इतकंही म्हटलं होतं की, तुमची मुलं दहशतवादी संघटनेत सामील होतील. खुद्द प्रियामणीने याचा खुलासा केला आहे.
लग्नाच्या आठ वर्षांनंतरही द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागत असल्याची तक्रार प्रियामणीने एका मुलाखतीत बोलून दाखवली. ती म्हणाली, “मुस्तफाशी साखरपुडा करणं हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदी क्षणांपैकी एक होता. मला तो लोकांसोबत शेअर करायचा होता. म्हणून मी साखरपुड्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली. परंतु त्यावरून लोकांनी मलाच ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. माझ्यावर, मुस्तफावर लव्ह-जिहादचे आरोप झाले. इतकंच नव्हे तर जेव्हा आम्हाला मुलं होतील, तेव्हा ते आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील होतील, अशा भयंकर कमेंट्स लोकांनी केल्या होत्या.”
अशा नकारात्मक कमेंट्सचा परिणाम झाला का, असा प्रश्न तिला पुढे विचारण्यात आला. त्यावर आपल्या भावना व्यक्त करत तिने सांगितलं, “मी सेलिब्रिटी असल्याने माझ्यावर टीका होणं मी समजून घेऊ शकते. पण जो या सगळ्याचा भागच नाही, त्याला का यात ओढताय. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला काहीच माहीत नाही. ते सर्व कमेंट्स वाचून दोन-तीन दिवस माझी खूप चिडचिड झाली होती. कारण मला सतत मेसेज येत होते. आजही मी एखादी पोस्ट केली तरी त्यावर दहापैकी नऊ कमेंट्स हे आमच्या धर्माविषयी किंवा जातीविषयी असतात.”
ट्रोलिंगनंतर टीकाकारांना उत्तर देण्यात काहीच अर्थ नसल्याचं प्रियामणीला जाणवलं. “आगीत तेल ओतल्याने कोणाचंच भलं होत नाही. मला त्या व्यक्तीला तितकंही महत्त्व द्यायचं नाहीये. त्यांना क्षणभरासाठी मिळणारं समाधान एंजॉय करू दे. अशा नकारात्मकतेला मी दुर्लक्ष करायला शिकलेय”, असं ती म्हणाली.