Madhu Kambikar: रंगमंचावर लावणी सादर केली अन् मेकअप रूममध्येच आला झटका; मधू कांबीकर यांच्यासोबत त्या दिवशी नेमकं काय घडलं?
Madhu Kambikar: मधू कांबीकर यांच्या आयुष्यातील हा सर्वांत कठीण प्रसंग होता. जवळपास दहा ते बारा वर्षांनंतर त्या पुन्हा लावणी सादर करण्यासाठी मंचावर उतरल्या होत्या.

Madhu Kambikar: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि प्रसिद्ध लावणी कलावंत मधू कांबीकर यांनी आपल्या अभिनयाने आणि नृत्यकलेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र, त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला होता, ज्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. रंगमंचावर लावणी सादर करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला. या घटनेनंतर त्यांना चित्रपटसृष्टीपासून दूर राहावं लागलं. एकेकाळी आपल्या ठसकेबाज अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या कलावंताच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आजही अनेकांना भावूक करतो. मधू कांबीकर यांचं आज (सोमवार, 10 नोव्हेंबर, 2026) पुण्यात निधन झालं. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
12 वर्षांनंतर रंगमंचावर केलं होतं लावणीचं सादरीकरण
27 नोव्हेंबर 2016 रोजी मुंबईतील माटुंगा इथल्या यशवंत नाट्यमंदिरात ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मधू कांबीकर तब्बल 10 ते 12 वर्षांनंतर पुन्हा लावणी सादर करण्यासाठी रंगमंचावर उतरल्या होत्या. त्यासाठी त्यांनी अनेक दिवस मेहनत घेतली होती. वयाच्या साठीमध्येही त्यांचा उत्साह आणि कलेप्रती असलेली निष्ठा कायम होती. कार्यक्रमादरम्यान त्यांनी दोन नृत्य सादर केली. त्यानंतर भैरवी सादर करण्यासाठी त्या रंगमंचावर आल्या. मात्र, नृत्य सादर करत असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. तरीही त्यांनी जिद्दीने आपलं सादरीकरण पूर्ण केलं.
मेकअप रूममध्ये अचानक प्रकृती बिघडली
कार्यक्रम संपल्यानंतर मधू कांबीकर मेकअप रूममध्ये गेल्या. तिथे त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि त्यांचा उजवा हात बधीर झाला. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका डॉक्टरांनी त्यांना प्राथमिक उपचार दिले. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील परळ इथल्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याचं समोर आलं होतं. सुरुवातीला त्यांनी उपचारांना प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. मात्र, या घटनेचा त्यांच्या पुढील आयुष्यावर मोठा परिणाम झाला. तेव्हापासून त्या अंथरुणालाच खिळून होत्या.
आजारपणामुळे अभिनयापासून राहिल्या दूर
मधू कांबीकर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’ आणि ‘बिनकामाचा नवरा’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कामाची आठवण आजही प्रेक्षक काढतात. लावणी, लोकनाट्य आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी मराठी मनोरंजनविश्व समृद्ध केलं. मात्र, पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या समस्या वाढल्या आणि त्यांना दैनंदिन जीवनासाठीही कुटुंबीयांच्या मदतीची गरज भासू लागली.