
बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून अभिनेते नितीश भारद्वाज घराघरात पोहोचले. या भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही प्रेक्षक त्यांचा तेवढाच आदर करतात. तर काहीजण साक्षात श्रीकृष्ण मानून त्यांचा आशीर्वादही घेतात. यावरूनच त्यांची लोकप्रियता लक्षात येते. परंतु गेल्या काही काळापासून ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळे त्रस्त आहेत. नितीश यांचं पहिलं लग्न स्मिता गेटशी झालं होतं. त्यांनी पूर्व पत्नी स्मिताविरुद्ध खटला दाखल केला होता. माझ्यापासून तिने मुलींना दूर केलं, असा आरोप नितीश यांनी या खटल्यात केला होता. ‘टेली टॉक’ला दिलेल्या मुलाखतीत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले.
या मुलाखतीत नितीश यांच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्हाला पुन्हा लग्न करावंसं वाटतं का, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या 11 वर्षांच्या जुळ्या मुली त्यांचा पिता म्हणून कसा द्वेष, तिरस्कार करतात, याविषयी त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, “त्या लग्नात मी सर्व प्रकारच्या छळाला तोंड दिलंय. आताही माझ्या दोन्ही मुलींना माझ्यापासून हिरावून घेतलं जात आहे. मी तुम्हाला फक्त दोन ओळी सांगतो, ज्या माझ्या 11 वर्षांच्या मुलींनी मला म्हटलं होतं. आम्हाला तुला बाबा म्हणायचा तिटकारा येतो, असं त्या म्हणाल्या. मुलींसाठी इतकं सगळं करूनही मला असं ऐकावं लागतंय.”
नितीश भारद्वाज यांनी गेल्या वर्षी पूर्व पत्नी स्मिता गाटेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. छळ आणि अयोग्य वर्तनाबाबत त्यांनी भोपाळच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती. नितीश यांनी त्यांच्या तक्रारीत स्मितावर बरेच आरोप केले होते. देवयानी आणि शिवरंजनी या आपल्या जुळ्या मुलींना भेटू देत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याचप्रमाणे स्मिता या मुलींना माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी सतत त्यांच्या शाळा बदलत असल्याचाही आरोप नितीश यांनी केला होता.
नितीश भारद्वाज आणि त्यांच्या आयएएस पत्नी स्मिता यांनी लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. 2009 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. तर सप्टेंबर 2019 मध्ये ते विभक्त झाले. स्मिता या जुळ्या मुलींसोबत सध्या इंदौरमध्ये राहत आहेत.