
ऑनलाइन फ्रॉड कॉल, डिजिटल फसवणुकीच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असताता. काही जण त्याला बळी पडतात तर काही जण सतर्क राहून असा फसवणुकींचा पर्दाफाश करतात. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने मात्र अशाच एका फ्रॉड कॉलची फिरकी घेण्याचं ठरवलं, ज्याचा व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. महानगर गॅसकडून आलेला हा फ्रॉड कॉल त्याने रेकॉर्ड केला आणि त्याचा व्हिडीओ त्याने नेटकऱ्यांसोबत शेअर केला आहे. सिद्धार्थचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी आणि मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
महानगर गॅसकडून कॉल केल्याचं सांगत समोरची व्यक्ती सिद्धार्थला व्हॉट्सअॅपवर काहीतरी मेसेज पाठवण्यास सांगत होती. परंतु सिद्धार्थला सुरुवातीपासूनच फसणवणुकीचा संशय आल्याने त्याने त्या व्यक्तीची फिरकी घेण्याचं ठरवलं. फोन स्पीकरवर ठेवत त्याने हे संभाषण रेकॉर्ड केलं. सुरुवातीला सिद्धार्थ त्या व्यक्तीला मराठीत बोलायला सांगतो. परंतु जेव्हा ती व्यक्ती आमच्याकडे इथे कोणीच मराठी बोलणारं नाही, असं सांगते, तेव्हा तो म्हणतो “महानगर गॅस.. महाराष्ट्राचा गॅस आहे, तिथे मराठी बोलण्याची परवानगी नाही का? तुम्ही एक काम करा.. मी मराठीत जे बोलतो, ते म्हणून दाखवा, मग मी तुम्हाला लगेच मेसेज करतो.” यानंतर सिद्धार्थ चक्क त्या व्यक्तीला ‘क्रांतीज्योति विद्यालय’ या त्याच्या चित्रपटातील ‘स्वर्गात आकाशगंगा’ या गाण्याच्या ओळी म्हणून दाखवायला सांगतो. या दोघांचा संवाद तुम्हालाही पोट धरून हसायला भाग पाडेल.
‘महाराष्ट्र गॅस फ्रॉड कॉल, मजा आली. सोनुरी काठे, झालाला.. कुठलीही सरकारी संस्था तुम्हाला व्हॉट्स अॅपवर चॅट करायला सांगत नाही. खूप लोक याला बळी पडत आहेत. सर्वांनी काळजी घ्या आणि त्यांची मजा घ्या’, असं कॅप्शन लिहित सिद्धार्थने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर मुक्ता बर्वे, वैदेही परशुरामी, स्पृहा जोशी, जितेंद्र जोशी, सारंग साठ्ये, आदर्श शिंदे, समृद्धी केळकर, क्षिती जोग, रुजुता देशमुख यांसारख्या कलाकारांनी कमेंट्स करत खूपच मजा घेतली आहे.