Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट! थेट मुख्यमंत्र्यांची भेट, बंद दाराआड काय चर्चा?
Pradeep Purnekar: ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरण हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई व्हावी ही कुटुंबियांची मागणी आहे. आता कुटुंबियांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पीडित कुटुंबातील राम पूर्णेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्णेकर कुटुंबीयांना आश्वासन दिले की, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळेल आणि मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर प्रकरणातील सध्याच्या तपासाबाबत विस्तृत माहिती मांडली. आतापर्यंत एसआयटी पथक, खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखा यांच्या संयुक्त कामगिरीतून पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र प्रकरणात आणखी काही नावे समोर आल्याने तपासाची गती आणि दिशा याबाबत कुटुंबीयांना चिंता होती.
कापूरबावडी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या जबाबात शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांची नावे मुख्य आरोपी म्हणून समोर आली आहेत. राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर थेट प्रश्न उपस्थित केला की, या दोघांची नावे पुरवणी जबाबात असूनही आतापर्यंत एसआयटी पथकाकडून त्यांना अटक का करण्यात आलेली नाही. या प्रश्नामुळे बैठकीत चर्चा अधिक गंभीर झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना धीर देताना सांगितले की, तपास पूर्णतः निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चालू आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींवर कडक कारवाई केली जाईल. सरकार कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. या भेटीनंतर आता मुख्यमंत्री पोलीस यंत्रणेला काय आदेश देतात आणि मीनाक्षी शिंदे व राजेंद्र शिंदे यांच्याबाबत काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाने ठाणे आणि आसपासच्या भागात संताप निर्माण झाला होता. कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच न्याय मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांची ही भेट आणि दिलेले आश्वासन कुटुंबाला दिलासा देणारे ठरले आहे. मात्र तपासातील पुढील पावले आणि अटकेबाबतची स्पष्टता याबाबत अद्याप अधिक माहिती समोर येणे बाकी आहे. सूत्रांच्या मते, येत्या काही दिवसांत या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी होऊ शकतात.
