Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आक्रमक, चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा

Maharashtra Epstein File Controversy : 'महाराष्ट्र एप्सटीन फाईल्स' हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून संभाजी ब्रिगेड या संघटनेनं सिनेमाच्या नावावर आक्षेप घेतला आहे. सिनेमाच्या नावातून 'महाराष्ट्र' हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Epstein Files : महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आक्रमक, चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा
| Updated on: Nov 13, 2026 | 7:56 PM

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटाची चर्चा रंगली आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याच्या नावावरून नवा वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाच्या शीर्षकात ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा वापर करण्यात आल्यानं संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. चित्रपटाच्या नावातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द काढून टाकावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

चित्रपटाच्या नावातील ‘महाराष्ट्र’ शब्दावर आक्षेप

Loading...

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाच्या नावावर संभाजी ब्रिगेडनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि परंपरा लाभली आहे. अशा महाराष्ट्राच्या नावाची तुलना एपस्टीनसारख्या व्यक्तीशी जोडणे योग्य नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. जेफ्री एपस्टीन हे नाव जगभरात कुप्रसिद्ध आहे. लैंगिक शोषण आणि अल्पवयीन मुलींशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमुळे त्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं होतं. त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावासोबत महाराष्ट्र या पवित्र भूमीचं नाव जोडण्यास संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे.

‘महाराष्ट्र’ नाव न काढल्यास चित्रपट रोखणार

चित्रपटाच्या निर्मात्यांनी शीर्षकातून ‘महाराष्ट्र’ हा शब्द तातडीनं हटवावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित हा विषय असल्याचं सांगत संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नावात बदल न केल्यास चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग रोखू, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या नावावरून सुरू झालेल्या या वादामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता चित्रपटाचे निर्माते या आक्षेपावर काय भूमिका घेतात आणि शीर्षकात बदल करतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ‘महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स‘ या सिनेमात मनोज जोशी मुख्य भूमिकेत असून दीपाली सय्यद, सुबोध भावे, उदय टिकेकर, अक्षय टांकसाळे, माधुरी पवार, भारत गणेशपुरे, अंजली जोगळेकर, अनिल नगरकर या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us