‘महाराष्ट्राची एकच भाषा मराठी’, संजय राऊत यांच्या आवाहनानंतर एक मराठी कलाकार उठला पेटून

"जेव्हा जेव्हा मराठी भाषेवर संकट येतं, तेव्हा-तेव्हा मराठी कलाकार पुढे येतात. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मराठी चित्रपट सृष्टी यांचं एक वेगळं नातं आहे. हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरेंनी जसं रान उठवले आहे, मला असं वाटतंय बाकीच्यांनी निष्कारण वाद थांबवला पाहिजे. ही हिंदी सक्ती आपण लहान मुलांवर आणि महाराष्ट्रावर लादतोय, ती लादू नये. आपली मराठी छान आहे तशीच राहू द्या" असं हा कलाकार म्हणाला.

महाराष्ट्राची एकच भाषा मराठी, संजय राऊत यांच्या आवाहनानंतर एक मराठी कलाकार उठला पेटून
संजय राऊत
| Updated on: Jun 25, 2025 | 3:09 PM

“हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात का करायची हा प्रश्न आहे. गरजच नाही, त्याहून पहिलीपासून हिंदी सक्ती करायची त्यात गडबड अशी आहे ती मुलं ना मराठी व्यवस्थित शिकणार, ना हिंदी. दोन्ही भाषेमध्ये त्यांचं कन्फ्युजन कायम राहील” असं अभिनेते रमेश परदेशी बोलले. “नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ती टिकवणे आपली जबाबदारी आहे. कुठेतरी हिंदी भाषेची सक्ती करून, कुठेतरी मराठीच महत्व कमी करतोय. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची कुठेही गरज नाही. संपूर्ण भारतातून लोक महाराष्ट्रात येतात. उलट त्यांनाच मराठी शिकवली पाहिजे, इथे राहणारे हिंदी भाषिक म्हणतात तुम्ही हिंदीची सक्ती का करता? आम्ही तर आमच्या मुलांना मराठी शिकवत आहोत” असं रमेश परदेशी बोलले.

“जे कुणी हे करते त्या सरकारला माझी विनंती आहे, हिंदीची सक्ती महाराष्ट्रात करू नये. त्याची आपल्याला गरज नाही. आपली भाषा ही प्रचंड समृद्ध आहे” असं रमेश परदेशी म्हणाले. “संगीतकार ए आर रहमानच्या मुद्द्यावर तुम्ही थेट काळजात हात घातला, जोपर्यंत महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाची मराठी अस्मिता जागी होत नाही, तोपर्यंत हे वाद होतच राहणार. कारण इथे राहणारा, येथे जन्मलेला प्रत्येक माणूस जोपर्यंत माझी भाषा ही श्रेष्ठ आहे माझी भाषा गोड आहे जोपर्यंत हे समजत नाही, तोपर्यंत तो भाषेचे महत्व स्वतःला आणि दुसऱ्याला पटवून देऊ शकत नाही” असं रमेश परदेशी बोलले. “कर्नाटकात जसे प्रकाश राज आहेत, तसं महाराष्ट्रात नाना पाटेकर, माधुरी दिक्षित, प्रशांत दामले कुठे आहेत?” असं हिंदी सक्तीच्या विषयावर बोलताना काल संजय राऊत यांनी म्हटलं होतं.

‘महाराष्ट्राची एकच भाषा आहे ती मराठी’

“साऊथमधील लोक त्यांच्या भाषेवर ठाम आहेत. मात्र आपलेच लोक आपल्याला बोलतात. हिंदी पण गोड भाषा आहे. खूप छान वाटते ऐकायला. पण त्याची सक्ती नाही पाहिजे. कुठलीही गोष्ट तुम्ही लादण्याचा प्रयत्न केला तर ती उफाळून येणार” असं रमेश परेदशी म्हणाले. “महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची एकच भाषा आहे ती मराठी आणि ती मराठीच असली पाहिजे. आमचा जवळचा मित्र प्रवीण तरडे हा कुठेही गेला तरी मराठी भाषेतच बोलतो. समोरच्याला येत नसेल तरी तो मराठीतच बोलतो, मला मराठी येते मला दुसरी भाषा येत नाही असं थेट सांगतो” असं रमेश परदेशी म्हणाले.

लंडनमध्ये जाऊन मराठी बोललेले लोक

“आम्ही लंडनमध्ये जाऊन मराठी बोललेले लोक आहोत आणि त्यामुळे मराठीचे महत्व हे कलाकारांना ठाऊक आहे. संजय राऊत यांना चुकीची माहिती मिळाली असेल कारण ते मोठे नेते आहेत” असं रमेश परदेशी म्हणाले.