
सोनी मराठी वाहिनीवरच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमानं महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत ज्यामध्ये अनेक दिग्गज नामवंत कलाकारही सहभागी आहेत. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘विनोदाचा बोनस’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2018 पासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोनी मराठी वाहिनीवर अविरत चालू आहे. विषयांचं नावीन्य, आपल्या मातीतला विनोद आणि मराठीमधल्या सर्व लहेजांचा गोडवा जपत हास्यजत्रेनं प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. एकवीसहून अधिक कलाकारांच्या संचानं नऊशेहून अधिक एपिसोड्स आणि सत्तावीसशेहून अधिक स्किट्सचं सादरीकरण करून विनोदी कार्यक्रमांच्या यादीत हास्यजत्रेला वरचं स्थान मिळवून दिलं आहे.
प्रत्येक सिझनमध्ये प्रेक्षकांसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न महाराष्ट्राची हास्यजत्राच्या संपूर्ण टीमचा असतो. या नवीन सिझनमध्येसुद्धा प्रेक्षकांचा ताण कमी करून विनोदाची हमी देणारे नावीन्यपूर्ण विषय घेऊन टीम सज्ज आहे. हा नवीन सिझन 7 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
समीर चौघुले, प्रियदर्शनी इंदलकर, शिवाली परब, प्रसाद खांडेकर, निखिल बने, मंदार मांडवकर, चेतना भट, ईशा डे, दत्तू मोरे, नम्रता संभेराव, प्रभाकर मोरे, श्याम राजपूत, विराज जगताप, वनीता खरात, अरुण कदम, रसिका वेंगुर्लेकर, प्रथमेश शिवलकर, श्रमेश बेटकर, ओंकार राऊत, आणि पृथ्वीक प्रताप या तुफान कलाकारांनी रंगवलेल्या विविध पात्रांवर प्रेक्षकांनी आजवर प्रेम केलं आहे. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कलाकार नव्या जोमानं प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. महाराष्ट्राची लाडकी निवेदिका प्राजक्ता माळी आणि हास्यरसिक सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांचीसुद्धा साथ आहेच.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – विनोदाचा बोनस’ हा नवा सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा सिझन प्रेक्षकांचा ताण कमी करण्याची हमी देत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – विनोदाचा बोनस’ येत्या 7 सप्टेंबरपासून रविवार ते बुधवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खोटंखोटं हसण्यापेक्षा मिळणार खर्याखुर्या हसण्याची हमी. कारण ‘विनोदाचा बोनस’ घेऊन येतोय आम्ही, अशी टॅगलाइन देत या शोचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.