
सध्या थिएटरमध्ये आणि सोशल मीडियावर एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, तो म्हणजे ‘महावतार नरसिम्हा’. पौराणिक कथेवर आधारित या ॲनिमेटेड चित्रपटात ना कोणता हिरो आहे किंवा ना कोणती हिरोईन. परंतु कथा, दिग्दर्शक, पार्श्वसंगीत आणि जबरदस्त अॅनिमेशनच्या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरतोय. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी कोणतंच प्रमोशनसुद्धा करण्यात आलं नव्हतं. माऊथ पब्लिसिटीमुळे प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे. आता ‘महावतार नरसिम्हा’च्या ओटीटी रिलीजविषयीची माहिती समोर आली आहे.
25 जुलै रोजी कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्मिती संस्था ‘होम्बाले फिल्म्स’च्या बॅनरअंतर्गत हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. याच प्रॉडक्शन हाऊसने ‘कांतारा’ची निर्मिती केली होती. एक ॲनिमेटेड चित्रपट असूनही ‘महावतार नरसिम्हा’ने प्राइम टाइमच्या मोठमोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. आता या चित्रपटाच्या ऑनलाइन रिलीजविषयी उत्सुकता आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे ‘महावतार नरसिम्हा’च्या टीमने अद्याप कोणत्याच डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत ओटीटी रिलीजसाठी डील केलेली नाही. डिजिटल पार्टनरचा उल्लेख चित्रपटाच्या पोस्टर आणि श्रेयनामावलीतही केला नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, हा चित्रपट सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच नवरात्रीच्या आसपास ओटीटीवर प्रदर्शित केला जाऊ शकतो. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर हिंदी भाषेत स्ट्रिम केला जाऊ शकतो, असंही कळतंय. परंतु याबाबतचं अधिकृत वृत्त अद्याप समोर आलं नाही. या चित्रपटाचे डिजिटल हक्क मिळवण्यासाठी अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्समध्ये स्पर्धा असल्याचंही समजतंय. याबद्दलची निश्चित माहिती ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत समोर येऊ शकतो.
‘महावतार नरसिम्हा’मध्ये भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची कथा दाखवण्यात आली आहे. भक्त प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी आणि असूर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी विष्णू नरसिंहाचा अवतार घेतात. या फ्रँचाइजीमध्ये इतरही चित्रपट येत्या काही वर्षांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 2027 मध्ये ‘महावतार परशुराम’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘महावतार नरसिम्हा’ने प्रदर्शनाच्या दहा दिवसांत 91 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.