Ponniyin Selvan 1 साठी ऐश्वर्या नव्हे तर ‘या’ दिग्गज अभिनेत्रीला होती पहिली पसंती

मणिरत्नम यांनी ऐश्वर्याच्या भूमिकेबद्दल केला मोठा खुलासा

Ponniyin Selvan 1 साठी ऐश्वर्या नव्हे तर या दिग्गज अभिनेत्रीला होती पहिली पसंती
Aishwarya
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 03, 2022 | 5:34 PM

मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 1’ (Ponniyin Selvan 1) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. 30 सप्टेंबर रोजी हा बिग बजेट चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) दुहेरी भूमिका साकारली आहे. मात्र त्या भूमिकेसाठी मणिरत्नम (Mani Ratnam) यांची पहिली पसंती ऐश्वर्याला नव्हती. त्यांनी बॉलिवूडमधल्या एका दिग्गज अभिनेत्रीचा त्या भूमिकेसाठी विचार केला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याविषयी खुलासा केला आहे. पोन्नियिन सेल्वन 1 हा कल्की यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे.

मणिरत्नम यांनी 80 च्या दशकातच या चित्रपटाचा विचार केला होता. “त्यावेळी जेव्हा मी हा चित्रपट बनवण्याचा विचार करत होतो, तेव्हा माझ्या डोक्यात सर्वांत आधी रेखा यांचं नाव आलं. पण मी कधीच त्यांना भूमिकेसाठी विचारलं नाही”, असं ते ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

ऐश्वर्या आणि मणिरत्नम यांनी याआधी ‘इरुवर’ आणि ‘रावण’ या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. “कलाकारांनी माझा नाही तर आधी कथेचा विचार करावा. ते चित्रपटासाठी तारखा देतात, माझ्यासाठी नाही. ऐश्वर्याने याआधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी भूमिका आहे”, असं ते म्हणाले.

पीएस- 1 या चित्रपटातील ऐश्वर्याच्या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप कौतुक होत आहे. तिने जवळपास दहा वर्षांनंतर तमिळ चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं आहे. पोन्नियिन सेल्वन 1 हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जगभरात तब्बल 230 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. यामध्ये जयम रवी, विक्रम, कार्ती, ऐश्वर्या राय, त्रिशा, सोभिता धुलिपाला, ऐश्वर्या लक्ष्मी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.