मनोहर जोशींची नात लग्नाबद्दल स्पष्टच बोलली; सांगितला आईचा भावूक प्रसंग

अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या तिच्या आगामी 'ये प्रेम मोल लिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच नवरीच्या भूमिकेत दिसणाऱ्या शर्वरीने प्रेम आणि लग्नाबद्दल आपले विचार मांडले आहेत.

मनोहर जोशींची नात लग्नाबद्दल स्पष्टच बोलली; सांगितला आईचा भावूक प्रसंग
Manohar Joshi and Sharvari Wagh
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2026 | 11:46 AM

Sharvari Wagh: बॉलिवूडमध्ये सध्या लग्न, प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल कलाकारांची वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात. अशातच राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आणि अभिनेत्री शर्वरी वाघ हिने प्रेम आणि लग्नाबद्दल आपलं मत मांडलं आहे. शर्वरी सध्या तिच्या आगामी ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या या चित्रपटात ती अभिनेता आयुष्मान खुरानासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात शर्वरी पहिल्यांदाच नवरीच्या वेशात पडद्यावर दिसणार आहे. यानिमित्ताने तिने प्रेम, लग्न आणि आपल्या कुटुंबाबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

काय म्हणाली शर्वरी?

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत शर्वरीला प्रेम आणि लग्नाबद्दल तिचे विचार विचारण्यात आले. यावर ती म्हणाली, “मी एका अतिशय पारंपरिक कुटुंबातून आले आहे, जिथे प्रेमाचा अर्थ लग्न असा होतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता आणि त्या व्यक्तीसोबत कमिटेड असता, तेव्हा लग्न हेच तुमचं अंतिम ध्येय असतं, असं मला वाटतं. एक व्यक्ती म्हणून माझाही यावर विश्वास आहे.” शर्वरीच्या या वक्तव्यामुळे तिच्या वैयक्तिक विचारांची चर्चा सुरू झाली आहे. पडद्यावर प्रेमकथा साकारणारी शर्वरी प्रत्यक्ष आयुष्यातही नात्यांकडे पारंपरिक दृष्टिकोनातून पाहते, हे तिच्या बोलण्यातून स्पष्ट झालं.

Loading...

पहा फोटो-

नवरीच्या रूपात पाहून आईला अश्रू अनावर

या चित्रपटात पहिल्यांदाच नवरीची भूमिका साकारण्याचा अनुभवही शर्वरीने सांगितला. विशेष म्हणजे, चित्रपटाचं शूटिंग सुरू असतानाच तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं. त्यामुळे घरात लग्नाचं वातावरण होतं. अशातच जेव्हा शर्वरीच्या आईने तिला पडद्यावर नवरीच्या रूपात पाहिलं, तेव्हा त्या भावूक झाल्या. शर्वरी म्हणाली, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी पडद्यावर नवरीची भूमिका साकारत आहे. माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न नुकतंच झालं होतं. त्यामुळे आईने मला नवरीच्या रूपात पाहिलं तेव्हा ती खूप भावूक झाली. तिची एक मुलगी लग्न करून आधीच घरातून निघून गेली होती. त्यामुळे मला त्या रूपात पाहून तिला अश्रू अनावर झाले.”

शर्वरीने चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचेही विशेष आभार मानले. त्यांनी आपल्याला पडद्यावर अतिशय सुंदर पद्धतीने सादर केल्याचं ती म्हणाली. स्वतःच्या लग्नातही कदाचित इतकं सुंदर दिसण्याची किंवा अशा पद्धतीने सादर होण्याची संधी मिळेलच असं नाही, असंही तिने मिश्किलपणे सांगितलं. दरम्यान, ‘ये प्रेम मोल लिया’ या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ यांची जोडी पाहायला मिळणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us