चाललंय काय? धावत्या लोकलमध्ये पुन्हा थरार; धारदार शस्त्राने थेट प्रवाशाच्या डोळ्यावर वार
धावत्या लोकलमध्ये पुन्हा थरारक घटना घडली आहे. तिघांनी धारदार शस्त्राने थेट प्रवाशाच्या डोळ्यावर वार केला आहे.

धावत्या लोकलमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धावत्या लोकलमध्ये बिडी ओढण्यास विरोध करणाऱ्या प्रवाशावर तीन तरुणांनी शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या या हल्ल्यात उल्हासनगरच्या भरत टोपले यांच्या डोळ्याच्या वर गंभीर दुखापत झालीये. भरत टोपले यांनी केवळ लोकलमध्ये बिडी ओढण्यास विरोध केला. त्यानंतर तिन्ही तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढलाय. जखमी भरत यांना कुर्ला स्थानकात जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच डोंबिवली जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरत टोपले हे कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे संघटनेचे शहाड प्रतिनिधी आहे. या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
उल्हासनगरचे भरत टोपले हे महाराष्ट्र शासनांतर्गत सुरक्षा रक्षक मंडळात काम करतात. ते कुर्ला स्टेशनवरून बीकेसी येथे नोकरीला जाण्यासाठी निघाले होते. ते पहाटेच्या पहिल्या कसारा लोकलने प्रवास करत होते. पहाटे 4 वाजून 57 मिनिटांनी लोकल शहाड स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने रवाना झालीये. याच लोकलमध्ये तीन तरुण धावत्या गाडीत बिडी ओढत होते. यावेळी भरत टोपले यांनी लोकलमध्ये बिडी ओढणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांना विरोध केलाय. मात्र, या विरोधाचा राग मनात धरून तरुणांनी आधी जळती बिडी फेकली. त्यानंतर ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान या तिघांपैकी एकाने धारदार शस्त्राने भरत यांच्या डोळ्यावर वार केलाय.
भरत यांच्या डोळ्याच्या वर गंभीर दुखापत झालीये. हल्ल्यानंतर तिन्ही तरुणांनी तिथून पळ काढलाय. त्यांना कामावर जायचे असल्याने कुर्ला रेल्वे स्थानकात उतरले. त्याठिकाणी जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांनी ऑनलाईन पद्धतीने त्यांची तक्रार नोंदवून घेतलीये. उपचारानंतर संबंधित डोंबिवली जीआरपी पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यानुसार दुपारनंतर ते अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
