इथे कोणी कोणाचा सख्खा नाही..; ‘आमने सामने’तून रोहन-केतकीला काढल्यानंतर मराठी कलाकार स्पष्टच बोलले

Aamne Samne: 'आमने सामने' या मराठी नाटकाच्या वादावर आता विविध कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. इथे कोणीच कोणाचा सख्खा नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री ऋतुजा बागवेनं दिली आहे.

इथे कोणी कोणाचा सख्खा नाही..; आमने सामनेतून रोहन-केतकीला काढल्यानंतर मराठी कलाकार स्पष्टच बोलले
मयुरी देशमुख, रोहन गुजर-केतकी पालव, ऋतुजा बागवे
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 29, 2026 | 12:46 PM

Aamne Samne: लीना भागवत आणि मंगेश कदम यांचं ‘आमने सामने’ हे नाटक जितकं रंगभूमीवर गाजलं, त्यापेक्षा जास्त आता त्यातील कलाकारांमधल्या वादामुळे चर्चेत आलं आहे. मानधनवाढ मागितली म्हणून तडकाफडकी आम्हाला नाटकातून बाहेर काढलं, अशी तक्रार अभिनेता रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी केली. त्यानंतर लीना आणि मंगेश यांनी व्हिडीओ पोस्ट करत त्यांची बाजू नेटकऱ्यांसमोर मांडली. यानंतर पुन्हा एकदा रोहन आणि केतकी यांनी व्हिडीओ पोस्ट करत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांसोबतच काही मराठी कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. इथे कोणी कोणाचा सख्खा नाही.., अशी रोखठोक प्रतिक्रिया अभिनेत्री ऋतुजा बागवेनं दिली आहे.

रोहन आणि केतकीच्या व्हिडीओवर कमेंट करत ऋतुजाने लिहिलं, ‘मानधनवाढ हा मुद्दा कलाकार आणि प्रॉडक्शनमधला आहे, त्यावर आम्ही बाजू घेणं चुकीचं आहे. पण तरीही ज्या पद्दतीने न सांगता रिप्लेस केलं, तेही इतक्या वर्षांच्या तुमच्या कमिटमेंटनंतर.. ते निराशाजनक आहे. तुम्ही तळमळीने बोलताय आणि ती गोष्ट तुम्हाला जास्त लागली आहे मानधनापेक्षा, हे मी अगदीच समजू शकते. इथे कोणी कोणाचा सख्खा नाही.. तुम्ही तुमचं काम मनापासून 100 टक्के चोख केलेलं आहे. आता बाकी सगळं कर्मावर सोडून द्या आणि पुढे जा.’

Loading...

कलाकारांच्या प्रतिक्रिया-

तर अभिनेत्री मयुरी देशमुखने म्हटलंय, ‘जेव्हा तुम्ही शून्यातून सुरुवात करून या स्पर्धात्मक क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करता, तेव्हा होणारा प्रत्येक छोटा अन्यायही मनाला टोचतो, वेदना देतो आणि मनावर एक जड ओझं निर्माण करतो. माझे मित्र केतकी आणि रोहन यांना इतकी समज आहे की, मतभेदांमुळे लोक एकमेकांपासून वेगळे होऊ शकतात आणि त्यांनाही ते मान्य होतं. परंतु, ज्या नाटकाशी ते सात वर्षांपासून जोडलेले होते, त्यातून त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकणं, हे अत्यंत अपमानकारक आणि अमानवीय आहे.’

अभिनेता वर्धन कामतने यावर तटस्थ भूमिका घेत रोहन आणि केतकीला सल्ला दिला आहे. ‘दोन्ही बाजू ऐकल्या. सात वर्षांच्या सहयोगानंतर जेव्हा अचानक काढलं जातं, तेव्हा गोष्टी चिघळणारच. इतक्या वर्षांत मर्यादा पुसट होतात, गोड-गोड बोलणं संपतं आणि संवाद क्रूर होतात. कदाचित कोणतीच बाजू विलेन नसेल. फक्त आताच्या कार्यपद्धतींच्या पलीकडे गेला असाल. पण त्याच वर्तुळात फिरायचं की त्यातून बाहेर पडायचं हा चॉइस असतो. जखम खाजवल्याने ती बरी होणार नाही. मान्यतेची अपेक्षा करण्याऐवजी तुमच्या कौशल्याचा प्रभावी वापर करा. जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, असं म्हणणं खूपच सामान्य वाटेल. पण ते सर्वोत्तम सर्जनशील इंधन आहे. या घर्षणाचे इंधनात रूपांतर करा. असं काहीतरी तयार करा की चर्चा बदलीवर नाही तर तुमच्या पुढचा प्रोजेक्टवर व्हावी,’ असं त्याने लिहिलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

‘आमने सामने’ या मराठी नाटकातून अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी पालव यांना अचानक बाहेर केल्याच्या आरोपांमुळे वाद निर्माण झाला आहे. रोहन आणि केतकी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत, अनेक वर्षे नाटकात काम करूनही कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्याला बाजूला केल्याची खंत व्यक्त केली. मानधनवाढीची मागणी केल्यामुळे हा निर्णय घेतल्याचा त्यांचा आरोप आहे. यानंतर नाटकाच्या निर्मात्या आणि अभिनेत्री लीना भागवत तसंच निर्माता-दिग्दर्शक मंगेश कदम यांनी आपली बाजू मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहन आणि केतकी यांनी तिसऱ्यांदा मानधनवाढ मागितली होती आणि दरवर्षी मानधन वाढवण्याची अपेक्षाही व्यक्त केली होती; मात्र निर्माते म्हणून ते शक्य नसल्याने त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे, रोहन आणि केतकी यांनी स्पष्ट केलं की, ही आठ वर्षांतील तिसरी मानधनवाढ होती, एका वर्षातील तिसरी मागणी नव्हती. त्यांनी दीड हजार रुपयांच्या वाढीच्या मुद्द्याचाही उल्लेख करत, इतकी वर्षे एकत्र काम केल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने नाटकातून बाजूला करण्यात आलं, त्याचं दुःख व्यक्त केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us