Chhaya Kadam : छाया कदम यांच्या शिरपेचात मनाचा तुरा! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्रीचा डंका! पोस्ट करत म्हणाली…

Chhaya Kadam : छाया कदम यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा सन्मान करण्यात आला असून अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

Chhaya Kadam : छाया कदम यांच्या शिरपेचात मनाचा तुरा! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्रीचा डंका! पोस्ट करत म्हणाली...
| Updated on: Nov 18, 2026 | 8:46 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री छाया कदम यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिली आहे. आपल्या सहजसुंदर आणि दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या छाया कदम यांना आता रशियातील प्रतिष्ठित ब्रिक्स+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. भारत आणि रशिया यांच्या संयुक्त निर्मितीत तयार झालेल्या ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी हा सन्मान मिळाला आहे.

‘स्नो फ्लॉवर’मधील नंदाच्या भूमिकेचा गौरव

Loading...

छाया कदम यांनी ‘स्नो फ्लॉवर’ या चित्रपटात नंदा ही भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष दखल घेण्यात आली. त्यांना ‘स्पेशल अवॉर्ड ऑफ द फेस्टिव्हल’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2026 या कालावधीत रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को येथे या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या चित्रपटात विविध संस्कृतींना जोडणारे समान धागे आणि एका जिवंत राष्ट्रीय व्यक्तिरेखेची प्रभावी निर्मिती केल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

कोकण ते सायबेरिया असा अनोखा प्रवास

‘स्नो फ्लॉवर’ हा भारत आणि रशिया यांची सहनिर्मिती असलेला मराठी चित्रपट आहे. दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कोकणातील लाल माती आणि सायबेरियातील बर्फाच्छादित प्रदेश अशा दोन वेगवेगळ्या भौगोलिक आणि सांस्कृतिक विश्वांचा अनोखा संगम या चित्रपटात पाहायला मिळतो. या चित्रपटात छाया कदम यांच्यासोबत वैभव मांगले यांनी दिग्या ही भूमिका साकारली आहे. तसंच सफू आलम आणि मनवा देवेंद्र भागवत यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.

छाया कदम यांची पोस्ट

छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘एक जबरदस्त आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करत आहे! माझ्या ‘स्नो फ्लॉवर’ या भारत-रशिया सहनिर्मित चित्रपटासाठी BRICS+ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मला ‘स्पेशल अवॉर्ड ऑफ द फेस्टिव्हल’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ‘स्नो फ्लॉवर’ या सिनेमाची गोष्ट कोकणातल्या लाल मातीत सुरू होऊन सायबेरियाच्या बर्फात एकरूप होते. हा सिनेमा आणि यातील माझी भूमिका माझ्यासाठी स्पेशल होती आणि कायमच राहील.’ छाया कदम यांनी ही पोस्ट शेअर करत संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

‘लापता लेडीज’नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा कौतुक

छाया कदम यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘मडगाव एक्सप्रेस’, ‘लापता लेडीज’ आणि ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. प्रत्येक भूमिकेत वेगळेपण जपणाऱ्या छाया कदम यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आता ‘स्नो फ्लॉवर’साठी मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीतूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us