‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’च्या पोस्टरला दमदार प्रतिसाद; मराठीसह इतर पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा

| Updated on: Jun 15, 2022 | 8:00 AM

कन्नड अभिनेता कवीश शेट्टीचा (Kaveesh Shetty) डॅशिंग लूक अनेकांच्या पसंतीस उतरला. त्या शिवाय एक मराठी सिनेमा इतर भाषेतही प्रदर्शित होत असल्याचं कौतुकही होत आहे.

आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेच्या पोस्टरला दमदार प्रतिसाद; मराठीसह इतर पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार सिनेमा
after operation london cafe
Image Credit source: Instagram
Follow us on

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीच्या ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’चं (After Operation London Cafe) पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. या सिनेमाच्या (Marathi Movie) पोस्टरला सर्व स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कन्नड अभिनेता कवीश शेट्टीचा (Kaveesh Shetty) डॅशिंग लूक अनेकांच्या पसंतीस उतरला. त्या शिवाय एक मराठी सिनेमा इतर भाषेतही प्रदर्शित होत असल्याचं कौतुकही होत आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी निर्माते दीपक पांडुरंग राणे यांच्या या वेगळ्या वाटेचं कौतुक केलं आहे. अभिनेता, ॲड गुरू भरत दाभोळकर, अभिनेत्री अश्विनी भावे, दिग्दर्शक समित कक्कड, गायिका प्रियांका बर्वे आणि सावनी रविंद्र, या शिवाय सोनाली खरे, ऐश्वर्या नारकर, तेजस्विनी पंडित, संदीप पाठक, अक्षया नाईक, पल्लवी सुभाष, दीप्ती देवी यांनी सोशल मीडियाद्वारे या सिनेमाला शुभेच्छा दिल्या आहेत.

दीपक राणे फिल्म्स आणि इंडियन फिल्म फॅक्ट्रीचा ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा सिनेमा मराठी आणि कन्नड भाषेत चित्रीत झाला आहे. तर हिंदी, तमिळ, तेलगु, मल्याळम या भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात कन्नड कलाकार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी आणि मराठीतील शिवानी सुर्वे, विराट मडके या कलाकारांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

पहा पोस्टर-

अनेक सुपरहिट मराठी सिनेमांची निर्मीती केल्यानंतर निर्माते दीपक पांडुरंग राणे ‘आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे’ हा सिनेमा घेऊन आले आहेत. याबद्दल सांगताना दीपक राणे म्हणतात, “दाक्षिणात्य प्रादेशिक सिनेमांनी त्यांच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. मराठी सिनेमाही आपल्या सीमा ओलांडू शकतो. मराठी सिनेमा विषयी कुतूहल आणि कौतुक सर्वच सिनेसृष्टीत आहे. नवनवीन विषय हाताळण्यात मराठी सिनेमा कुठेच मागे नाही. त्यामुळेच आपणही आपला सिनेमा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित केले पाहिजेत. त्यामुळे मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.” दीपक पांडुरंग राणे यांच्यासोबत विजय शेट्टी आणि रमेश कोठारी यांनीही आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफेची निर्मिती केली आहे. हा सिनेमा याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.