भारताची फाळणी झाली, माणसंही विभागली; पण ‘या’ गझलेवर भारत-पाकिस्तान दोन्ही देश फिदा
Mehdi hassan ghazal ranjish hi sahi : भारताची फाळणी झाली, लाखो लोकांना आपली जन्मभूमी सोडावी लागली. राजस्थानमध्ये जन्मलेले हे प्रसिद्ध गायकही पाकिस्तानात गेले. पुढे त्यांचा आवाज दोन्ही देशांतील संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करू लागला. 1971 च्या युद्धानंतर काही महिन्यांतच त्यांनी गायलेली एक गझल भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली.

देशाची फाळणी झाली, लाखो लोकांना आपलं घरदार सोडून दुसऱ्या देशात जावं लागलं. राजस्थानमध्ये जन्मलेले मेहदी हसन हेसुद्धा पाकिस्तानात गेले आणि पुढे मोठे गझलगायक झाले. पण त्यांच्या आवाजाची जादू काय फक्त पाकिस्तानपुरती राहिली नाही, तर भारतातही त्यांचे तुफान चाहते तयार झाले. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे, 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर अवघ्या काही महिन्यांत त्यांची एक गझल दोन्ही देशांमध्ये भलतीच गाजली. ती गझल म्हणजे ‘रंजिश ही सही’. दोन देशांत राजकारणावरून विस्तव जात नसतानाही या गझलेने दोन्हीकडच्या लोकांची मनं जिंकून घेतली.
फाळणीने देश बदलला, पण संगीताची नाळ काही तुटली नाही
मेहदी हसन मूळचे राजस्थानच्या लुना गावचे. त्यांच्या घरातच संगीताचं वातावरण होतं, त्यांचे कुटुंब ध्रुपद गायकीशी जोडलेलं होतं. फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले आणि तिथे त्यांनी गाणं पुन्हा सुरू केलं. शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास आणि गझल गाण्याची त्यांची एकदम हटके स्टाईल यामुळे ते पुढे ‘शहंशाह-ए-गझल’ बनले.
युद्ध संपल्यावर जन्माला आली ‘रंजिश ही सही’
1971 ला भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध झालं आणि त्यानंतर दोन्ही देशांत भारी तणाव होता. अशा वातावरणात मेहदी हसन यांनी अहमद फराझ यांचे शब्द आपल्या आवाजात मांडले. या गझलेचं संगीत निसार बज्मी यांचं होतं. यात राग यमन वापरला होता आणि सोबतच राजस्थानच्या ‘मांड’ लोकसंगीताची झलकही होती.
ही गझल 1972 मध्ये पाकिस्तानात आलेल्या ‘मोहब्बत’ चित्रपटात होती. चित्रपट आल्यावर या गाण्याने तर धुमाकूळच घातला. प्रेमात दुरावा आल्यावरही प्रिय व्यक्तीने पुन्हा भेटायला यावं, अगदी परत सोडून जायला का असेना, ही भलतीच आर्त भावना या गझलेतून लोकांपर्यंत पोहोचली.
सीमेच्या दोन्ही बाजूंना एकच सूर
या गझलेची सगळ्यात मोठी गंमत म्हणजे तिच्या लोकप्रियतेला कुठलीच सीमा रोखू शकली नाही. भारत-पाकिस्तानमध्ये कितीही वाद असो, दोन्हीकडच्या संगीतप्रेमींनी या गाण्यावर भरभरून प्रेम केलं. मेहदी हसन यांच्या आवाजाने, अहमद फराझ यांच्या शब्दांनी आणि निसार बज्मी यांच्या संगीताने अशी काही जादू केली की ही गझल अजरामर झाली.
ज्या कलाकाराला फाळणीमुळे आपली जन्मभूमी सोडावी लागली, त्याच माणसाच्या आवाजाने दोन्ही देशांतल्या लोकांना एकत्र आणलं. आजही ‘रंजिश ही सही’ ऐकली की लोक त्या जुन्या सुरात न्हाऊन निघतात. राजकीय सीमा कितीही आखल्या गेल्या आणि माणसं कितीही विभागली गेली, तरी संगीताच्या बाबतीत दोन्ही देशांचं नातं किती घट्ट आहे, याची आठवण ही गझल आजही करून देते.